मुंबई - ठाणे महापालिका हद्दीत राबविण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेत मातीची बेकायदेशीर वाहतूक करून राज्य सरकारची स्वामित्व रक्कम (रॉयल्टी) बुडविणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिला. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने बावनकुळे यांनी आज बैठक घेतली. राज्य सरकारची फसवणूक करणाऱ्या कोणाचीही हयगय करणार नाही, असा इशारा दिला.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेसाठी नेमलेले कंत्राटदार आनंद कंस्ट्रवेल यांनी शिल्लक राहिलेल्या मातीची रॉयल्टी न भरता तसेच परवानगी न घेता मातीची बेकायदा वाहतूक केली होती. या ठेकेदाराने सुमारे चार कोटी ८३ लाख ८० हजार ८०० रुपयांची रॉयल्टी बुडविल्याचेही निदर्शनास आले होते.
तातडीने कारवाई
ठाणे आणि मीरा- भाईंदरमध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरू आहेत. जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटिसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे.
हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमिनींवर फलक लावून त्या ताब्यात घ्याव्यात, असा आदेश बावनकुळे यांनी अन्य एका बैठकीत दिला.