Import Tariffs : निर्यातदारांनाे, नव्या बाजारपेठांचा शोध घ्या...! वाणिज्य मंत्रालयाचे प्रोत्साहन; २० देशांची नावनिश्चिती
esakal April 08, 2025 08:45 AM

नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयातर्फे देशातील निर्यातदारांना जगभरात नव्या बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयातशुल्क वाढीच्या परिणामस्वरूप चीनसारख्या देशांकडून वाढणाऱ्या आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी निर्यात धोरणांची आखणी आणि तातडीने अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या अतिरिक्त २६ टक्के निर्यात शुल्काच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाच्या हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेव्यतिरिक्त अन्य बाजारपेठांमध्ये निर्यातवाढ करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने २० देशांची नावे निश्चित केली असून, या सर्व देशांमध्ये भारतीय निर्यातदारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग (एमएसएमई) निर्यातदारांसाठी स्वतंत्र योजना आखण्याचे काम सुरू असून, त्याअंतर्गत उद्योगांना सोप्या अटींवर कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना पर्यायी वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे, तसेच निर्यातीमध्ये आयातशुल्काव्यतिरिक्त येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी साहाय्य करणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने २०२५-२६ साठीच्या अर्थसंकल्पातही निर्यात प्रोत्साहन अभियान राबविण्याची घोषणा करत त्यासाठी सुमारे दोन हजार २५० कोटी निधीची तरतूद केली आहे. या योजनेवर वाणिज्य मंत्रालयासोबतच एमएसएमई व अर्थमंत्रालयही आवश्यक तेथे सहभागी होणार आहे.

डीजीटीआर ठेवणार विशेष लक्ष

दरम्यान, अमेरिकेने चीनवर ५४ टक्के आयातशुल्क लादल्यामुळे तेथील अतिरिक्त उत्पादन भारतात वळवले जाण्याची शक्यता असल्याने, वाणिज्य मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेड रेमिडिजला (डीजीटीआर) सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चीनमधून येणाऱ्या वस्तूंची विशेष तपासणी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या देशांत निर्यातीवर भर देणार

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, बांगलादेश, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, नेदरलँड्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान (तुर्किये), संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका आणि व्हिएतनाम

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार (२०२३–२४)
  • एकूण व्यापार: ११९.७१ अब्ज अमेरिकी डॉलर

  • निर्यात: ७७.५१ अब्ज अमेरिकी डॉलर

  • आयात: ४२.१९ अब्ज अमेरिकी डॉलर

  • व्यापारातील तूट: ३५.३१ अब्ज अमेरिकी डॉलर

भारत आणि चीन दरम्यान व्यापार (२०२३–२४)
  • एकूण व्यापार: ११८.३९ अब्ज अमेरिकी डॉलर

  • निर्यात: १६.६५ अब्ज अमेरिकी डॉलर

  • आयात: १०१.७३ अब्ज अमेरिकी डॉलर

  • व्यापारातील तूट: ८५ अब्ज अमेरिकी डॉलर

निर्यातवाढीसाठी
  • उद्योगांना केंद्राकडून स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होणार

  • नवीन बाजारपेठे शोधण्यावर भर

  • युरोपीय महासंघ, ओमान, न्यूझीलंड आणि ब्रिटन या देशांसोबत मुक्त व्यापार करार संदर्भातील वाटाघाटींवर चर्चा पूर्ण करण्यावर भर

  • ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन आणि फ्रान्ससह अन्य २० महत्त्वाच्या देशांशी द्विपक्षीय व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी बोलणी करणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.