टळटळीत दुपार होती. म्हणजे रामराणा जन्मला ती वेळ. इतिहासपुरुष श्वास रोखून बैसला होता. ऐतिहासिक घडना घडली रे घडली की ती मराठीत लेहून काढायची, हे त्याचे विहीत कार्य तो नेमाने पार पाडीत होता. त्याचे सारे लक्ष शिवाजी पार्काच्या काठावरील ‘शिवतीर्थ’गडावर लागले होते. राजियांचा आदेश सुटला आणि महाराष्ट्रसैनिकांच्या फौजा बँकांकडे चौटाप उधळल्या. ‘‘बँकाबँकांत जा, पेढीपेढीत जा, जेथ मऱ्हाटी भाषा बोलली जात नाही, तेथे चांगली जरब बसवा. नच ऐकल्यास बँकांमध्ये काचा आणि कुंड्या कमी नाहीत. तेही नसल्यास गाल नावाचा अवयव हरेक गनिमांस असतोच.
निघा!’’ राजियांचा हा शेलका आदेश झेलून महाराष्ट्रसैनिक निघाले. बँका आतून कशा असतात, हे अनेक शिलेदारांस माहीतच नव्हते. तेथे पैका ठेवला आणि काढिला जातो. पैक्याचा आणि आपला काय संबंध? तरीही दार ढकलोन फौजा शिरल्या…
‘‘क्या काम हय?’’ दारावरील सुरक्षारक्षकाने पहिली चूक केली.
‘‘तेरेकू उठाने का हय…मराठीत बोल बे..,’’ एका शिलेदाराने अत्यानंदाने आवाज चढवला. ज्या मोहिमेवर आलो, ती मोहीम पहिल्या पावलात सत्कारणी लागली. ‘‘डिपॉझिट करने का है, या पैसा निकालने का हय? स्लीप भरने का है क्या? चेककू पिन अच्चेसे लगाव, हमकू टोचता है’’ सुरक्षा रक्षकाने कटकटून विचारले.
एकीकडे तो स्लिपांवर स्टांप मारुन चेक दुसऱ्या ड्रावरात ठेवत होता. ‘‘तुझ्या नानाची टांग! बऱ्या बोलानं मराठीत बोल, तर सांगतो,’’ शिलेदाराने दम भरला.
‘‘अहो, मी मराठीच आहे, उगीच कशाला तणातणी करताय? इथं सगळेच मराठी आहेत!’’ सुरक्षारक्षक न घाबरता म्हणाला. मराठी माणूसच तो, कशाला घाबरेल?
‘‘तो फिर हिंदी में क्यूं बात करताय?’’ शिलेदाराला पाणउतारा सहन झाला नाही. ‘‘सवय लागलीय, काय करु? सॉरी!’’ सुरक्षा रक्षक म्हणाला.
‘‘रिझर्व बँकेचे नियम माहीत आहेत ना? मराठी अनिवार्य आहे! मराठी लोक इथं चेक टाकायला येतात,’’ शिलेदार ओरडला. सगळे हसले!
‘‘मराठी लोक इथं पैसे काढायला किंवा भरायला येतात,’’ शिलेदार पुन्हा ओरडला. सगळे पुन्हा हसले!
‘‘रोज येत नसतील, पण कधी कधी येतात ना,’’ शिलेदार थोडा नरमला.
‘‘सठीसहामासी येतो योग, साहेब! बाकी इतर अमराठी लोकच येतात!’’ सुरक्षा रक्षकाने ही माहिती द्यायला नको होती. शिलेदाराला नाही म्हटले तरी ती झोंबली. पण मराठी माणसावर हल्ली बँकेत जाण्याची पाळी क्वचित येते, हे दाहक वास्तव त्याला नजरेआड करता येईना.
‘‘चेक…सॉरी धनादेश टाकायला आलेल्या माणसाशी तुम्ही मराठीत बोलता का?,’’ शिलेदाराने नवा मुद्दा उपसला.
‘‘धनादेश म्हणजे मनिऑर्डर! ती पोस्टात मिळते!’’ सुरक्षा रक्षकाचे मराठीचे ज्ञान अभिजात असावे!
‘‘बरं डिमांड ड्राफ्ट!’’ शिलेदाराने दुसरा शब्द दगडासारखा हातात घेतला.
‘‘त्याला धनाकर्ष म्हणतात…म्हणे!’’ सुरक्षारक्षकाने पर्यायी शब्द सुचवला. मुळात बँकेलाच मराठीत अधिकोष म्हणतात, ही नवी माहिती मिळाल्याने गलितगात्र झालेल्या महाराष्ट्र सैनिकांनी कुणाला तरी बडवावे या इराद्याने स्वत:चे कपाळच बडवले. धनादेश, धनाकर्ष, अधिकोष, मुदतठेव, आवर्ती ठेव असल्या शब्दांचे दगड अधिक भारी असतात!
मराठीचा हा क्लास भर बँकेतच सुरु झाल्याने हवालदिल झालेल्या महाराष्ट्र सैनिकांच्या फौजांमध्ये चलबिचल जाहली. तशी ती होत असतानाच ‘शिवतीर्था’वरोन नवा आदेश प्राप्त जाहला. : ‘‘मोहीम त्वरित थांबवणे. जल्द अज जल्द उलट पावली निघोन येणे. इतउप्पर सारे काही मराठी प्रजेच्या हाती असे!’’
सुटकेचा निश्वास टाकत फौजा परतल्या. इति.