पांडुरंग म्हस्के
मुंबई : सरकारी लालफितीचा फटका आता चक्क सरकारी बाबूंनाच बसला आहे. विशेष म्हणजे हे सरकारी बाबू साधेसुधे नसून मंत्र्यांच्या आस्थापनेवरील आहेत. मंत्र्यांच्या आस्थापनेवर विविध विभागातून स्वीय सहायक म्हणून गेलेल्या ‘अ’ वर्ग श्रेणीतील अधिकाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडले आहेत.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला दोन -अडीच विलंब झाला. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायक आणि खासगी सचिवांच्या नेमणुकीतही वेळकाढूपणा करण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांच्या आस्थापनेवर अन्य विभागातील अधिकाऱ्यांची स्वीय सहायक आणि खासगी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र या अधिकाऱ्यांना या नवीन पदस्थापनेबाबत नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागातून मुक्त करण्यात आले असल्याने त्यांचा पगार त्यांच्या मूळ विभागातून निघू शकत नाही. दुसरीकडे नवीन विभागाचे नियुक्ती पत्र नसल्याने या विभागातूनही पगार निघू शकलेला नाही.
या संदर्भात काही अधिकाऱ्यांना विचारले असता, ज्यांच्या विभाग बदलला नाही त्यांचे पगार झाले आहेत. मात्र ज्यांना त्यांच्या खात्याव्यतिरिक्त अन्य खात्याच्या मंत्र्यांकडे नियुक्ती मिळाली आहे. त्यांच्याच बाबतीत हे घडले असल्याचे सांगण्यात आले.
कागदपत्रांमुळे समस्यासामान्य प्रशासन विभागाच्या म्हणण्यानुसार या अधिकाऱ्यांची कागदपत्रे नवीन विभागाकडे गेलेली नसल्याने त्यांच्या पगाराबाबत अडचणी उद्भवलेल्या असू शकतात, ही कागदपत्रे यापूर्वीच जमा केली असल्याचे या पदावर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.