काँग्रेसने अमेरिकेसह मोदींवरही साधला निशाणा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. भारतातही आज बाजार उघडताच 3,000 पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदवण्यात आली. बाजारातील घसरणीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी शेअर बाजार उद्ध्वस्त केल्याची टिपण्णी केली. तसेच केंद्रातील रालोआ सरकारवरही निशाणा साधला.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या मुद्यावर काँग्रेसने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करण्यात माहीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयराम रमेश यांनी यावर ट्विट करत भाष्य केले आहे.
सुप्रिया श्रीनेत यांचे ट्विट
बाजारातील सततच्या घसरणीवर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट केले आहे. शेअरबाजार वेगाने घसरत आहे. आज बाजार कोविडनंतरच्या सर्वात कमी पातळीवर उघडला आहे. 5 मिनिटांत 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. लहान गुंतवणूकदार या विनाशाकडे पाहत आहेत. पण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत लोकांना इतक्या लवकर टिप्स देणारे मोदी शाह गप्प का आहेत? अशी विचारणा केली.
राहुल गांधींनी दिला होता इशारा
गेल्या आठवड्यात लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला इशारा दिला होता. करांच्या वाढत्या बोजामुळे भारतीय उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांदरम्यान देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? अशी विचारणाही राहुल गांधी यांनी केली होती.