उत्तर प्रदेशातील वाराणसीत संतापजनक अशी घटना घडलीय. स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर सहा दिवस अत्याचार करण्यात आले. एक दोन नव्हे तर तब्बल २३ जणांनी सहा दिवस बलात्कार केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं दिलीय. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात १२ जणांची नावे असून ११ जण अज्ञात आहेत. या प्रकरणी राज विश्वकर्मा, समीर, आयुष, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद, जाहिर, इमरान, जॅब, अमन आणि राज खान यांना आरोपी करण्यात आलंय. सगळेच हुकुलगंज आणि जवळपासच्या परिसरातील रहिवाशी आहेत.
डीसीपी चंद्रकांत मीना यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन पथकं स्थापन करतून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आलीय. यातील सहा जणांना रविवारी रात्रीच ताब्यात घेतलं होतं. पांडेयपूर चौकीचे प्रभारी श्रीराम उपाध्याय यांनी सांगितलं की, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सामूहिक बलात्काराची ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलीय. २९ मार्च रोजी मैत्रिणीच्या घरून परतताना वाटेतच राज विश्वकर्मा यानं बलात्कार केला. त्यानंतर ३० मार्चला समीर नावाच्या तरुणाने अत्याचार केले. या घटनेनं घाबरलेली तरुणी रात्रभर फिरत होती. त्याच अवस्थेत ३१ मार्चला आयुष नावाच्या तरुणानं नदेसरमध्ये मित्रांसोबत मिळून अत्याचार केले आणि कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेच्या आईनं सांगितलं की, घाबरलेल्या मुलीच्या स्थितीचा गैरफायदा घेतला गेला. आयुषनंतर हॉटेलच्या बाहेर तिला इमरान भेटला. त्यानं गुंगीचा पदार्थ खायला घालून बलात्कार केला. त्यानंतर फिरताना मुलीला साजिद मित्रांसोबत दिसला. त्यानं औरंगाबादमधील गोदामात नेऊन अत्याचार केले. यानंतर साजिद तिला पुन्हा एका खोलीत घेऊन गेला आणि तिथं पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले गेले.
मुलीवर अत्याचारानंतर तिला सिगरा इथल्या मॉलजवळ सोडलं आणि २ एप्रिलला सकाळी राज खान नावाचा तरुण भेटला. त्याने हुकुलगंजमध्ये घरी नेलं. तिथंही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. पण तरुणीने प्रतिकार केल्यानं सोडून देण्यात आलं. ३ एप्रिलला मुलगी मैत्रिणीच्या घरी गेली. सायंकाळी घरी येत असताना वाटेत दानिश भेटला. तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यावेळी सोहेल, शोएब आणि दुसऱ्या एकाने तिच्यासोबत गैरकृत्य केलं. त्यांच्या तावडीतून सुटून मुलगी पुन्हा मैत्रिणीकडे गेली आणि ४ एप्रिलला घरी पोहोचल्यानंतर तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितल्याचं आईनं म्हटलंय.
धक्कादायक बाब म्हणजे आयुष आणि त्याच्या मित्रांच्या तावडीतून सुटलेली पीडिता, एक एप्रिलला साजिद आणि त्याच्या मित्रांच्या तावडीत सापडली. दोघांनीही गर्ल्स हॉस्टेलच्या नावाखाली तिला हॉटेलमध्ये नेलं. तिथं आधीपासून तीन जण होते. पाच जणांनी हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाला मसाज करण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा तिनं नकार दिला तेव्हा बलात्कार केला आणि बाहेर काढल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केला आहे.