मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून आज (16 एप्रिल) नाशिकमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्याव्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज पुन्हा एकदा शिवसैनिकांना ऐकायला मिळाला. एआय निर्मित आवाजात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र बाळासाहेबांच्या या एआय आवाजावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. किमान मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे. (Chandrashekhar Bawankule targets Uddhav Thackeray over Balasaheb’s AI voice)
शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धात मेळाव्यात बाळासाहेबांचा एआय आवाज वापरल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी धिक्कार केला आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो. परंतु मला खात्री आहे की, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिले, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, कलम 370 रद्द करणार्याला विरोध करणार्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करून गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती. ज्या गोष्टींसाठी बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये. त्यांचे विचार बुडवलात, आता किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : सरसंघचालक आणि काँग्रेसच्या प्रमुखांची आतापर्यंतची यादी काढा; काय म्हणाले ठाकरे?
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणातून भाजपावर निशाणा साधण्यात आला. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवले, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्ष आमचे त्यांचे नाते होते. महाराष्ट्रात ते शिवसेनेमुळेच वाढले. मग नातं तोडंल कोणी? असा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू एकएक करून बाहेर काढतो. कारण त्यातच मजा असते. बरं तो आपला बबन घोलप कुठे आहे. अरे कुठे भरकरटताय इकडे तिकडे. अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा साधा शिवसैनिक बसलाय ना तो महत्त्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं, असा मुद्दा भाषणातून मांडण्यात आला.
हेही वाचा – Sanjay Raut : तुलसी गेबार्ड मोदीची बहीण, ती खोटं बोलणार नाही; ईव्हीएम हॅकवर काय म्हणाले राऊत?