जगभरातील शेअर बाजार कोसळण्यापूर्वी एलन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांना अडवले होते, पण…
Marathi April 08, 2025 04:24 PM

डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे दर युद्ध: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर लादलेल्या करामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विपरीत पडसाद उमटत आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या या निर्णयानंतर सोमवारी आशियाई देशांमध्ये शेअर बाजार कोसळले होते. भारतामध्ये सेन्सेक्स 2700 अंकांनी कोसळला होता. तर निफ्टीही 900 अंकांनी खाली आला होता. भारतीय भांडवली बाजारातील ही गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचे सीईओ आणि अमेरिकन सरकारमधील डीओजीई विभागाचे प्रमुख एलन मस्क यांनी पडद्यामागे टॅरिफ धोरण थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प (Elon Musk) यांना अन्य देशांवर कर लादण्याच्या विचाराचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 34 टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीननेही ट्रम्प यांना जशास तसे प्रत्युत्तर देत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के कर लादण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु होण्याचा धोका निर्माण झाला होता. हा सगळा धोका अगोदरच ओळखून एलन मस्क यांनी हस्तक्षेप करत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इतक्या वेगाने आणि आक्रमक पद्धतीने अन्य देशांवर कर लादू नयेत, अशी विनंती केली होती. मात्र, एलन मस्क यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एलन मस्क यांनी सोशल मीडियावर मिल्टन फ्रीडमन यांचा एक व्हिडीओही शेअर केला होता. त्यामध्ये जागतिक व्यापारामुळे सगळ्यांना कसा फायदा होतो आणि कर वाढवणे हे जागतिक व्यापारासाठी कसे घातक आहे, असा विचार या व्हिडीओतून मांडण्यात आला होता. त्यामुळे आता आगामी काळात डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आशियाई शेअर बाजार सावरले, निक्की, कोस्पी वधारले

कालच्या पडझडीनंतर जपानच्या शेअर बाजाराचा निर्देशांक निक्की 5.5 टक्क्यांनी सावरला आहे. काल निक्की 8 टक्क्यांनी कोसळला होता. आज भांडवली बाजार उघडताच निक्कीने 225 अंकांची उसळी घेतली. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकही दोन टक्क्यांनी वधारला आहे. याशिवाय, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारही सावरले आहेत. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे आशियाई शेअर बाजारांमध्ये झाला होता भूकंप. भारतीय शेअर बाजारही या धक्क्यातून सावरला आहे. काल सेन्सेक्स तब्बल 2200 अंकांनी कोसळला होता. मात्र, आज बाजार उघडताच सेन्सेक्स 300 अंकांनी वधारल्याचे दिसत आहे.

https://www.youtube.com/watch?v=ercnajngidq

आणखी वाचा

आख्खा शेअर बाजार बरबाद झाला पण ‘या’ 3 शेअर्सचे गुंतवणूकदार प्रॉफिटमध्ये

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.