ठाणे : रस्त्यावर उभ्या राहिलेल्या तरुणांना वाट सोडण्यासाठी एक्स्युज मी म्हटल्यानंतर त्या तरुणांनी दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. डोंबिवली पश्चिममधील जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली आहे. इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं म्हणत तीन तरुणांनी दोन तरुणींना मारहाण केलं. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दोन तरुणी दुचाकीने इमारतीतील पार्किंगमध्ये जात असताना त्यांनी रस्ता अडवलेल्या तीन तरुणांना बाजूला होण्यासाठी एक्स्युज मी असं म्हटलं. त्यानंतर त्या तीन तरुणांनी त्या महिलांना इंग्रजीत बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं सांगत वाद घातला. नंतर त्या तरुणींना बेदम मारहाण करण्यात आली.
दोन्ही तरुणींच्या तक्रारी नुसार विष्णू नगर पोलिस ठाण्यात अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुण आणि तरुणींमध्ये वाद सुरू असताना त्या ठिकाणी ए आणि बी इमारतीलमधील लोकही सामील झाले. खरेतर, या दोन्ही इमारतीतील लोक एकमेकांना ओळखतही नसताना त्यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये काहीजणांनी काठ्यांचा वापर करुन एकमेकांवर हल्ला केला.
फक्त ‘एक्स्युज मी’ असं म्हटल्यानंतर इतका वाद होऊ शकतो का? या वादाला काही पूर्वीच्या वादाची किनार आहे का? अशा गोष्टींची पोलिस आता तपास करत आहेत.
डोंबिवलीमध्ये या आधी मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. मात्र आता इंग्रजी बोलल्यामुळे हा वाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..