दीननाथ मंगेशकर हॉस्पिटल: पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (दि. 07) सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी रुग्णालय प्रशासनावर खळबळजनक आरोप केलाय.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे. मंगेशकर कुटुंबियाच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे. महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे. त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड झालेला आहे, तो देखील त्यांनी भरलेला नाही. हे सगळं कोणाच्या जिवावर चालते? यांच्या पाठीशी कोण आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे. संचालक तिथे मालक म्हणून वावरतात. त्यांना राजकीय सपोर्ट असल्याने आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या धुंदीत ते वागतात. दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
तिथे कुठल्याही नियमाप्रमाणे वागले जात नाही. तिथे कमर्शिअल व्यवसाय होत असल्याने रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तर याआधी देखील रुग्णालयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर दंड आकारला आहे. मात्र रुग्णालयाने दंड भरलेला नाही. ते मनमानी कारभार करतात. जो पर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही, असे देखील रवींद्र धंगेकर म्हणाले. राज्य सरकारने या हॉस्पिटलला वेगवेगळे सुविधा दिल्या आहेत. या हॉस्पिटलने आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा कर देखील थकवला आहे, असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=idypkj1kxt8
आणखी वाचा
अधिक पाहा..