मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील तापमानाच्या पाऱ्यामध्ये वाढ झाली आहे. राज्यातील तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पार गेला असून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, तापमानाचा पारा सातत्याने नवा उच्चांक गाठत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरात सोमवारी (ता. 7 एप्रिल) सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकणातही उष्ण आणि दमट वातावरण पुढील काही दिवस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Temperatures rise Shahapur in Thane is the hottest)
यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील व मध्य भारतात याचा अधिक प्रभाव राहणार आहे, असे भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालातून सांगण्यात आले होते. पण त्याहीपेक्षा जास्त तापमानाची नोंद आता राज्यातील विविध जिल्ह्यात करण्यात येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे वाढत्या तापमानात नागरिकांनी दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणे टाळावे आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात येत असल्याने नागपूर मनपाने उष्णतेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परंतु, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा… Maharashtra Weather : महाराष्ट्र तापला, अनेक जिल्ह्यातील तपमान 40 अंशांवर
मुंबईतही पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण पुढील दोन ते तीन दिवसांत यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील धसईमध्ये आज 43.9 एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर बदलापूर शहरात पारा हा 42 अंशांवर पोहोचला होता. ही उष्णतेच्या लाटेची सुरुवात असल्याचे मत हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार असून, दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत.