मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली होती. कालच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. निफ्टी 50 निर्देशांकात 374 अंकांची तर सेन्सेकमध्ये 1089 अंकांची वाढ झाली. जागतिक बाजारातील तेजी आणि ट्रेड वॉरचा भारतावर होणारा परिणाम तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यानं शेअर बाजार सावरला. निफ्टीचे 13 प्रमुख विभागीय निर्देशांक देखील तेजीमध्ये दिसून आले. सर्वाधिक तेजी टायटन, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये दिसून आली. शेअर बाजारातील आजचं कामकाज संपलं तेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 374.25 अंकांच्या तेजीसह 22535.85 वर बंद झाला. तर, सेन्सेक्स 1089.18 अंकांच्या वाढीसह 74227.08 पर्यंत पोहोचला.
आशियाई बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. यामुळं भारतीय शेअरला चांगला सपोर्ट मिळाला. जपानचा नक्केई 225 निर्देशांक 5.5 टक्क्यांनी वाढला. चीनचा शाघांई कम्पोझिट 1 टक्क्यांनी वधारला. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ संदर्भातील धोरण येत्या काळात बदलू शकतात, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. सोमवारी रात्री अमेरिकन बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळालं होतं. नॅस्डॅक कम्पोझिट निर्देशांक 0.10 टक्क्यांनी वाढला. एस अँड पी 500 आणि डॉव जोन्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. चीननं अमेरिकेवर लादलेलं टॅरिफ मागं घेतलं नाही तर अतिरिक्त 50 टक्क टॅरिफ लादू असं ट्रम्प म्हणाले. चीननं माघार न घेतल्यास त्यांच्यावर अमेरिकेकडून एकूण 104 टक्के टॅरिफ लादलं जाईल. चीननं अमेरिकेपुढं न झुकता अमेरिकेवर पलटवार केला आहे. अखेरपर्यंत लढू, अशी भूमिका चीननं घेतली आहे. यूरोपियन यूनियन, जपान यांनी अमेरिकेसोबत चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. भारताची देखील अमेरिकेसोबत चर्चा सुरु आहे. जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वीके. विजयकुमार यांच्या मते व्यापार युद्ध अमेरिका-चीन यांच्यामध्ये सुरु राहील. अमेरिकेत मंदीचं संकट वाढलं आहे. चीनवर टॅरिफचा सर्वाधिक परिणाम होईल. चीनवर अमेरिकेनं 104 टक्के टॅरिफ लादल्यास निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय शेअर बाजाराला मजबुती देतो. आर्थिक वर्ष 2024-25 च्या आर्थिक सर्व्हेमध्ये भारताचा जीडीपी 6.3 टक्के ते 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वीके. विजयकुमार यांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, वाढीच्या अनेक शक्यता आहे. लार्ज कँप कंपन्यांचं मूल्यांकन अजूनही आकर्षक असून विदेशी गुंतवणूकदारांची यावर नजर राहू शकते. जिओजित इनवेस्टमेंट्स चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांच्यामतानुसार निफ्टीनं 22165 चा टप्पा गाठला आहे. पुढचा टप्पा 22522 आहे. दरम्यान तो देखील टप्पा बाजारानं पार केला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..