अहमदाबाद : काँग्रेस पक्ष संघटनेची पुनर्बांधणी व भाजपला समर्थ पर्याय देण्याची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसची कार्यकारिणी बैठक आणि अधिवेशन आठ आणि नऊ एप्रिलला अहमदाबाद येथे होत आहे.
याआधी गुजरातमध्ये काँग्रेसचे शेवटचे अधिवेशन १९६१ मध्ये भावनगरमध्ये झाले होते. त्यानंतर ६४ वर्षांनंतर होणारे हे अधिवेशन म्हणजे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये आपला गमावलेला जनाधार परत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मानला जात आहे.
सरदार पटेल यांचे स्मारक असलेल्या सरदार मेमोरियल स्थळी उद्या (ता.८) सकाळी साडेअकराला कार्यकारिणीची बैठक होईल. तर बुधवारी साबरमतीच्या काठावर साबरमती रिव्हर फ्रंट येथे अधिवेशन होईल. अहमदाबाद अधिवेशनामध्ये राजकीय आर्थिक परिस्थितीवर पक्षाची भूमिका ठरविणारे ठराव संमत केले जाणार आहेत.
यासोबतच जनाधार वाढविण्यासाठी आगामी काळात जिल्हा आणि बूथ पातळीवर पक्ष बांधणीच्या आराखड्यावरही मंथन अपेक्षित आहे. या प्रस्तावांवर विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येतील.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे प्रभारी व सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते, कायम निमंत्रित सदस्य, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस यासारख्या संलग्न संघटनांचे प्रमुख विस्तारित कार्यकारिणीमध्ये सहभागी होतील. तर अधिवेशनात देशभरातून ३००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.
‘पलायन रोको’ पदयात्रेत राहुल गांधी सहभागीपाटणा बिहारमध्ये काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पलायन रोको, नोकरी दो’ पदयात्रेत लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी सोमवारी सहभागी झाले. बिहारमधील बेगुसराई येथे ते पदयात्रेत सहभागी झाले आहेत. बिहारमधील पूर्व चंपारण्य जिल्ह्यातून या यात्रेची सुरुवात झाली आहे.
यावेळी कन्हैय्या कुमार आणि बिहारचे प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारमध्ये मागील चार महिन्यातील राहुल यांचा हा चौथा दौरा आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा वैचारिक पराभव करा असे आवाहनही राहुल गांधी यांनी बिहारमधील नागरिकांना यापूर्वीच केले आहे.