आयपीएल 2025 स्पर्धेतील 21वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. या खेळपट्टीचा लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. 20 षटकात 3 गडी गमवून 238 धावा केल्या आणि विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं. यावेळी मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आक्रमक खेळी केली. मिचेलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 38 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण कोलकात्याच्या फलंदाजांनी तशीच साजेशी खेळी केली. पण धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही. रिंकु सिंहने शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करत सामन्यात येण्याचा प्रयत्न केला. पण तसं काही शक्य झालं नाही.
कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 234 धावा केल्या. पण विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यरने चांगली खेळी केली. अजिंक्य रहाणेने 35 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 61 धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 45 धावा केल्या. तर रिंकु सिंहने 15 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 38 धावा केल्या. रिंकु सिंहने विजय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. पण आवेश खानच्या षटकात दोन बॉल डॉट गेल्याने प्रेशर वाढलं. तसेच शेवटच्या चेंडूवर चौकार आल्याने स्ट्राईक बदलली आणि गणित चुकलं.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी.