सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला. बाळासाहेब पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कारखाना कार्यक्षेत्र पिंजून काढत त्यांच्या विरोधातील नरेटिव्ह खोडून काढण्यात यश मिळवल्याचं निकालातून पाहायला मिळालं.
राज्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. सातारा जिल्ह्यात महायुतीनं सर्व जागा जिंकल्या. कराड उत्तरचे 5 टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा देखील पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होती. विधानसभा निवडणुकीच्या विजयावेळीच तसे संकेत दिले गेले होते. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं आहे.
बाळासाहेब पाटील यांनीच त्यांच्या विजयी भाषणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला. पराभवानं कधी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला तर तो पचवण्याची ताकद पाहिजे. चव्हाण साहेबांच्या त्या विचारानं पुढं चाललो आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या, आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, आम्ही जिंकणार, नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरुन कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडं बघून शड्डू ठोकला गेला. एक आहे 32 हजार लोकांशी लढत होती ते विसरले. कुणापुढं उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले होते. विरोधकांची खासगीत चर्चा काय कारखाना ताब्यात घ्यायचा, अधिकारी नेमायचे आणि पीडी साहेबांचा पुतळा इथून काढायचा… अरे तुम्हाला माहिती नाही, आम्ही दु:खात असताना सह्याद्री साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पै पै गोळा करुन पुतळा उभा केला. कराड पालिकेसमोरील पुतळा देखील कर्मचाऱ्यांनी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या मुलांनी पैसे देऊन उभारला, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. पीडी पाटील साहेबांनी कराड शहरासाठी आणि कारखान्यासाठी घातलं तुम्ही कोणत्या वल्गना करता, असं ते म्हणाले होते.
सातारा लोकसभा मतदारसंघात मविआचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला एकाही मतदारसंघात यश मिळालं नाही. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड, साताराकोरेगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यात आहे. बाळासाहेब पाटील यांनी विजयी सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढायच्या आहेत, असं जाहीर केलंय. त्यामुळं साताऱ्यातील मविआच्या घटकपक्षांचा आगामी काळात आत्मविश्वास नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. बाळासाहेब पाटील यांनी पाच टर्म आमदार म्हणून काम केलं आहे. मविआ सरकारच्या काळात ते सहकार मंत्री होते. सह्याद्रीतील बाळासाहेब पाटील यांचा विजय साताऱ्याच्या राजकारणात टर्निंग पॉईंट ठरतो का ते येणाऱ्या काळात दिसून येतं का ते पाहावं लागेल.
अधिक पाहा..