4 दिवसात साईचरणी 4 कोटी 26 लाखांचं दान, राम नवमीच्या काळात अडीच लाख भाविकांनी घेतलं दर्शन
Marathi April 08, 2025 10:24 PM

श्री साईबाबा सांस्मान: रामनवमी उत्सवाच्या 4 दिवसात साईचरणी भाविकांनी तब्बल 4 कोटी 26 लाखांचे दान दिले आहे. मोठ्या प्रमाणात भाविक दररोज साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. राम नवमीच्या काळात मात्र, मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले होते. या काळात भाविकांनी साईचरणी भरभरुन दान दिलं आहे. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दानपेटीत 1 कोटी 67 लाख 89 हजार 78 रूपयांच दान देण्यात आले आहे. तर देणगी काऊंटरवर 79 लाख 38 हजार रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. सशुल्‍क दर्शन पासच्या माध्यमातून 47 लाख 16 हजार 800 रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. तर डेबीट क्रेडीट कार्ड , क्रेडिट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी., मनी ऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 24 लाख 15 हजार 214 रुपये मिळाले आहेत. 6 लाख 15 हजार रुपयांचे 83 ग्रॅम सोने तर 1 लाख 31 हजार रुपये किंमतीची 2 किलो चांदी दान स्वरुपात देण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली आहे. एकूण रुपये  4 कोटी 26 लाख 07 हजार 182 रुपयांचे दान साईचरणी देण्यात आले आहे. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे ते म्हणाले.

देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले होते

दरम्यान, रामनवमी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होतात. रामनवमी उत्सव आणि पालखीचं एक वेगळ नातं असल्यानं या उत्सवासाठी खास करुन मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. अनेक वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहानं साजरा केला जातो. मुंबई आणि परिसरातून पालखीसोबत येणाऱ्या पदयात्रेकरता साईबाबा संस्थानने निवासासाठी उत्तम सोय केली होती. मुंबई ते शिर्डी महामार्गावरील विविध ठिकाणी पालख्या थांब्यांसाठी 1 लाख 17 हजार चौ.फूट कापडी मंडप उभारण्यात आले होते. यामध्ये विद्युत आणि पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली होती. तसंच, यावर्षीपासून भाविकांसाठी भजन आणि कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्य आणि निवास व्यवस्था देखील प्रभावीपणे करण्यात आली होती. पालख्या शिर्डी येथे पोहोचल्यावर पदयात्रेकरता साई धर्मशाळेत नाममात्र दरात निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसंच, सिन्नर ते शिर्डी या मार्गावर तातडीच्या वैद्यकीय सुविधासाठी साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वतीनं फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या:

शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.