मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद झाला होता. त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून विरोधकांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. असे असतानाच आता बैठकीला अर्धात उशिराने पोहोचल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना खडे बोल सुनावले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. आजच्या बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशिराने पोहोचले. याच कारणामुळे अजित पवार संतापले होते. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनता दरबारालाही माणिकराव कोकाटे अनुपस्थित राहात होते, या सर्व बाबींचा आढावा अजित पवार यांनी या बैठकीत घेतला.
माणिकराव कोकाटे काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना त्यांनी अवकाळीमुळे शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली होती. याच पाहणीदरम्यान एका शेतकऱ्याने कर्जमाफी होणार का? असा सवाल कोकाटे यांना केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे काहीसे संतापले होते. कर्जमाफीच्या पैशांचं काय करता. लग्न, साखरपुडे यासाठी हे पैसे वापरले जातात. तसेच कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचा उपयोग शेतीसाठी केला जातो का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यांच्या याच विधानानंतर वाद झाला होता. विरोधकांनी त्यांनी मागावी तसेच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. नंतर कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश होता.