अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताला भेट द्या
Marathi April 17, 2025 04:25 PM

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे या महिन्यातच भारत दौऱ्यावर येत असून, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंबंधी चर्चा करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या भारत दौऱ्याची माहिती आता अधिकृतपणे देण्यात आल्याने या दौऱ्याची निश्चिती झाली असून, या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील प्रस्तावित व्यापार कराराच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

ते सहकुटुंब भारतात येणार असून आग्रा आणि जयपूरलाही भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. व्हान्स यांच्या पत्नी उषा या हिंदू असून त्यांचा हा प्रथमच भारत दौरा आहे. त्या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.

चर्चा प्रगतीपथावर

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंबंधीची चर्चा प्रगतीपथावर आहे. या चर्चेचा प्रारंभ फेब्रुवारीपासूनच झाला असून दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा अपवाद वगळता सर्व देशांवर लागू केलेल्या व्यापार शुल्काला 3 महिन्यांची स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या कालावधीतच भारत आणि अमेरिका एक प्राथमिक व्यापारी करार करण्याच्या विचारात आहेत.

आशयपत्रावर स्वाक्षऱ्या

व्यापार करार करण्याआधी दोन्ही देशांच्या आधिकाऱ्यांनी एका आशयपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे व्यापार करार प्रक्रिया अधिक गतिमान होत आहे. दोन्ही देशांना लाभदायक ठरेल, असा एक व्यापार करार येत्या तीन महिन्यात केला जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली असून त्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. तसा करार झाल्यास भारताच्या दृष्टीने ती समाधानाची बाब असेल. तसेच, त्यामुळे व्यापार संघर्षही टाळला जाणार आहे.

सर्वात मोठा व्यापार

भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेशी आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांनी एकमेकांशी 118 अब्ज डॉलर्स, अर्थात, साधारणत: 10 लाख कोटी रुपयांचा व्यापार केला. हा व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सचा करण्याचे दोन्ही देशांचे ध्येय आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या चर्चेत हे ध्येय ठरविण्यात आले आहे. आता अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात येत आहेत. त्यामुळे त्वरेने करार करण्याच्या दिशेने दोन्ही देशांची पावले पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.