Dombivli MIDC News: डोंबिवलीत हिरवा पाऊस आणि आता काळे ठिपके, यामागचं गूढ काय?
Saam TV April 09, 2025 12:45 AM
अभिजित देशमुख, डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरात वाहनांवर, पत्राच्या शेडवर तसेच कपड्यांवर काळे ठिपके पडल्याचे लक्षात आल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत भीती निर्माण झाली आहे. याबाबत आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष राहुल कामत यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एमआयडीसीमध्ये जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी या अधिकाऱ्यांना मनसेने चांगलाच धारेवर धरलं. 'आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, येत्या महिनाभरात जर प्रदूषणासोबत ठोस कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने धडा शिकवू.', असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

एमआयडीसी मिलननगर परिसरात सोमवारी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर काळे ठिपके पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी आसपासच्या परिसरात पाहणी केली असता असेच काळे ठिपके पत्र्याचे शेड तसेच कपड्यांवर देखील पडल्याचं लक्षात आलं. डोंबिवली एमआयडीसी परिसरात याआधी देखील हिरवा पाऊस, रस्त्यावर वाहणारे रासायनिक सांडपाणी, उग्र दर्प यामुळे प्रदूषणाच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच सोमवारी काळा ठिपक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

काळे ठिपके हे प्रदूषणामुळे पडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने सोमवारी या परिसराची पाहणी केली. 'या ठिपक्यांचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल.' असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र याबाबत मनसेने आक्रमक पवित्र घेतला. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढताना मनसे पदाधिकर्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ यामधून नियंत्रण हा शब्द काढा, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असं नाव ठेवा असा उपहासात्मक सल्ला दिला. कल्याणमधील कार्यलयात बसून डोंबिवली एमआयडीसीमधील प्रदूषण पाहता काय??! असा सवाल विचारत मंडळाचे अधिकारी करतात काय?, कंपन्यामध्ये बसून पाहणी करत असल्याचा आरोप केला. यावेळी मनसेच्या वतीने डोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रदूषण मोजण्यासाठी मशीन लावा त्याचप्रमाणे डोंबिवली देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बसवा अशी मागणी करण्यात आली.

या मागणीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पिंपळेश्वर मंदिराजवळ प्रदूषण मोजण्याचे मशीन आहे ,येत्या काही दिवसात घरडा सर्कल जवळ प्रदूषण मोजण्यासाठी आणखी एक मशीन बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बसणार असल्याचे सांगितले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका नसेल तर आमचा नाईलाज असेल, आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका येता महिनाभरात प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.