How Does Alcohol Cause Cancer In The Human Body: कोणतेही व्यसन हे माणसाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी हानिकारकच असते. ही व्यसने वेळीच मोडली नाहीत तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या अनेक व्यासनांपैकी एक म्हणजे दारूचे व्यसन. दारू प्यायल्याने फक्त शारीरिक किंवा मानसिक आरोग्यच खराब होत नाही तर, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचाही धोका निर्माण होतो.
दारू आणि कर्करोगभारतात दारूच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका आता वाढू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते दारू प्यायल्याने २० पेक्षा जास्त प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामध्ये विशेषतः तोंड, घसा, अन्ननलिका, पोट मोठे आतडे, गुदाशय (rectum), स्वादुपिंड (pancreas), महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
दारू शरीरात गेल्यावर त्यापासून अॅसिटअल्डिहाइड नावाचे एक विषारी रसायन तयार होते. जे DNA आणि प्रथिनांचे नुकसान होण्यासाठी कारणीभूत ठरते. परिणामी कर्करोगासाठी जबाबदार म्युटेशन्स तयार होतात. याशिवाय दारूमुळे शरीराला आवश्यक असलेले फोलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन्स A, C, D आणि E यांचे शोषण कमी होते; जे आपल्या पेशींच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात.
फक्त कर्करोगच नाही, तर दारूचे सतत सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्तीही हळूहळू कमी होते. त्यामुळे शरीरात कॅन्सरसारख्या आजारांशी लढण्याची ताकदच उरत नाही.
WHO अहवालWHO च्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर सुमारे 4 टक्के कर्करोगाचे प्रकार हे थेट दारूच्या सेवनाशी संबंधित आहेत. द लॅन्सेट (The Lancet) या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 2020 मध्ये भारतात जवळपास 62,100 नवीन कर्करोग रुग्ण दारूच्या सेवनामुळे झाले.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, अमेरिकेचे सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोका स्पष्टपणे दर्शवणारी लेबल्स लावणे आवश्यक असल्याचे मत मांडले आहे, जेणेकरून लोकांना दारूच्या वापराचे गंभीर परिणाम समजून घेता येतील.
दारूशी संबंधित कर्करोगाची लक्षणेयकृताचा कर्करोग - पोट फुगणे, डोळे आणि त्वचा पिवळी होणे, थकवा, भूक मंदावणे
तोंड आणि घशाचा कर्करोग - न बऱ्या होणाऱ्या जखमा, रक्तस्राव, गिळण्यात अडचण, सतत घसा खवखवणे
अन्ननलिकेचा कर्करोग - गिळण्यास त्रास, छातीत दुखणे, वजन कमी होणे, सतत खोकला, आवाजातील बदल
स्तनाचा कर्करोग - छातीत किंवा छातीजवळील भागात गाठी, स्तनाचा आकार बदलणे, स्तनातून स्त्राव
लवकर निदान करणे महत्त्वाचेडॉक्टरांच्या नुसार कर्करोगाचे जेवढ्या लवकर निदान केले जाते, तेवढे उपचार प्रभावी होतात. पण जर तो शरीरातील इतर भागात म्हणजेच मेंदू, यकृत, हृदय, मूत्रपिंड किंवा फुफ्फुसांमध्ये पसरतो, तेव्हा उपचार कठीण होतात.
उपायदारूचे कमी सेवन
WHO च्या मते कोणत्याही प्रमाणात घेतलेली दारू आरोग्यासाठी चांगली नसते. त्यामुळे खूप कमी प्रमाणात दारूचे सेवन करावे, शक्यतो टाळावे.
नियमित तपासणी
अतिधोक असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
कुठलेही असामान्य लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.