वाशी, ता. ८ (बातमीदार) : ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पंधरवडाभर ‘जागर’ व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात ‘प्रिय भिमास...’ या कार्यक्रमाद्वारे कवी अरुण म्हात्रे यांनी गंधार जाधव व गाथा आयगोळे या गायकांच्या साथीने महामानवाला शब्द स्वरांजली अर्पण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
डॉ. बाबासाहेबांच्या कविता आणि गाणे म्हणजे प्रकाशाचे गाणे असून, ते अंधारलेल्या आयुष्याला उजेड दाखविणारे आहे. ‘जागर’ म्हणजे केवळ गुणगान नाही; तर प्रत्यक्षात अंमलात आणायचा निश्चय आहे, असे म्हणत कवी अरुण म्हात्रे यांनी गीत-काव्यात्म प्रबोधन केले. कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट, वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ, अशोक नायगावकर, संभाजी भगत यांच्यासह स्वत:च्याही कविता सादर करीत अरुण म्हात्रे यांनी वातावरण भारून टाकले. ‘भीमा भिमराया’ हे अरुण म्हात्रे लिखित गीत भावपूर्ण शैलीत सादर करीत रसिकांची दाद मिळविणाऱ्या गायक गंधार जाधव यांनी ‘तुझ्यासाठी तो झिजला त्याचं आटलं रगात’, ‘तेज भिमाच्या बुद्धीचं जरा भिनू दे अंगात’ हे आपल्या आजोबांचे गीत गात डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
गायिका गाथा जाधव यांनी सादर केलेल्या ‘माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं...’ गाण्याने रसिकांना भुरळ घातली. बार्टीमध्ये सादर केले जाणारे अप्रतिम ‘संविधान गीत’ सादर झाल्यानंतर अरुण म्हात्रे यांनी ‘समाजमुक्तीचे गाणे बाबासाहेबांनी लिहिले’ अशा शब्दात संविधानाचा गौरव केला.
----------------
स्मारकाबाहेर थेट प्रक्षेपण
‘कबीरा कहे ये जग अंधा’ या गीतातून बाबासाहेबांना गुरुस्थानी असलेल्या कबीराचे तत्त्वज्ञान सांगून कविवर्य सुरेश भट यांच्या ‘भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ या कवितेने कार्यक्रमाची सांगता करताना सर्व श्रोत्यांनी उभे राहून बाबासाहेबांना मानवंदना दिली. श्रोत्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्मारकाबाहेर मोठी स्क्रीन लावून लाइव्ह प्रक्षेपण बघण्याची सुविधा करून देण्यात आली होती. त्या ठिकाणीही रसिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.