विरार, ता. ८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेची निवडणूक गेल्या पाच वर्षांपासून रखडली आहे. वसई तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी (ता. ७) तहसीलदार कार्यालय येथे जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुका २०२५-२०३० या कालावधीकरिता तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्यामार्फत ही आरक्षणे जाहीर करण्यात आली.
१२ ग्रामपंचायती या बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी राखीव आहेत. या ग्रामपंचायतीची आरक्षणे तहसीलदार कार्यालयात सोडत पद्धतीने काढण्यात आली. यातील अनुसूचित जमाती महिलांसाठी एक, तर मागास प्रवर्गमधील सर्वसाधारणसाठी दोन ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या आहेत. अन्य ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून, यामध्ये चार ग्रामपंचायती, तसेच अनुसूचित जाती (स्त्री राखीव)साठी एक, तर सर्वसाधारण स्त्री राखीवमध्ये चार ग्रामपंचायती आहेत. सर्वसाधारण महिला राखीवमध्ये अर्नाळा, वासळई, तरखड, टेंभी व पाली ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटात अर्नाळा किल्ला, तसेच मागास प्रवर्ग (महिला राखीव)मध्ये खर्डी आणि डोलीव ग्रामपंचायत आहे. सर्वसाधारण पुरुष गटात कळंब, खोचिवडे, सत्पाळा व पाणजू ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच अनुसूचित जाती (स्त्री राखीव) रानगाव ग्रामपंचायतीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.