आयपीएल 2025 स्पर्धेतील 22 वा सामना आज (8 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघामध्ये खेळला गेला. हा सामना पंजाब किंग्सने 18 धावांनी जिंकला. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तसेच चेन्नईला गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या. आता चेन्नईला जिंकण्यासाठी 220 धावांचं आव्हान दिलं होतं.
धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघ फक्त 201 धावा करू शकला. चेन्नईसाठी सर्वाधिक धावा डेवॉन कॉन्वेने केल्या, त्याने 49 चेंडूत 69 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 6 चौकार तर 2 षटकार झळकावले. तसेच शिवम दुबेने 42 तर धोनीने 27 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड 1 धावेवर परत गेला.
पंजाबसाठी लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेतली.
पंजाबसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा प्रियांश आर्याने केल्या, त्याने 42 चेंडूत 103 धावांची शानदार पारी खेळली. त्याने सात चौकार व नऊ षटकार झळकावले. पंजाबच्या या मोठ्या धावसंख्येत प्रियांशची कामगिरी सर्वात मोठी आहे. तसेच पंजाबसाठी शशांक सिंगने 36 चेंडूत 52 धावा केल्या. याचबरोबर मार्को यान्सनने 34 धावा केल्या. याशिवाय पंजाबचा कोणताच फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही. पंजाबने 6 खेळाडू गमावून 219 धावा केल्या होत्या.
चेन्नईसाठी गोलंदाजी करताना खलील अहमदने 4 षटकात 45 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर आश्विनने देखील दोन विकेट्स घेतल्या, याचबरोबर नूर अहमदने 1 विकेट घेतली. चेन्नईचा हा सलग चौथा पराभव आहे.