मोरवाडीत उद्यान सीमाभिंत बांधकाम सुरू
सकाळ इम्पॅक्ट
पिंपरी, ता. ८ : मोरवाडी येथील श्रद्धा हेरिटेज सोसायटीशेजारील महापालिका उद्यानाची सीमाभिंत कोसळली होती. याबाबत ‘सकाळ’ने ‘मोरवाडीत कोसळली उद्यानाची सीमाभिंत’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने सीमाभिंत बांधण्यास सुरूवात केली.
मोरवाडी परिसरात श्रद्धा हेरिटेजच्या युनिट ‘ए’च्या ७ इमारती, ‘बी’च्या २ इमारती, रेणुका गुलमोहर फेज-१च्या ७ इमारती आणि फेज २ च्या १० इमारती असून ५०० सदनिकाधारक आहेत. होळीच्या दिवशी येथील सीमाभिंत कोसळली. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नव्हती. काही स्थानिकांनी मद्यपींनी भिंत फोडल्याचे सांगितले आहे. तरी महापालिका अधिकारी तिकडे फिरकले नसल्याचे तक्रार नागरीकांनी केली होती. या उद्यानात लहान मुले खेळत असतात. पण, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यान ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था आहे.
उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेले
उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेले आहे. उद्यानाचे २४ तास उघडेच असल्यामुळे दिवसभर तरुणांचा गोंधळ सुरू असतो. उद्यान ठराविक वेळेत बंद नसल्याने कायमच रहदारी असते. मुले उद्यानात खेळत असतात. दुसरीकडे मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. देखभालीअभावी हे उद्यान बंद करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे सुरक्षारक्षक नसल्याने रात्री मद्यपी आवार करतात. वारंवार तक्रार करूनही आपल्याला कुणीही वाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होत आहे. दुसरीकडे महापालिका अधिकाऱ्यांनी सीमाभिंत बांधण्यास तत्परता दाखवली आहे. पण, उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेतच आहे. याकडे कोण लक्ष देणार आहे का? असे नागरिक विचारू लागले आहेत.