डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ३० ला
मोफत सामुदायिक विवाह सोहळा
सकाळ वृत्तसेवा
शाहूनगर, ता. ८ ः ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा मंदिरात मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली १४ वर्षे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा विवाह सोहळा म्हणजे गोरगरीब कुटुंबांचा आनंद सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये ट्रस्टकडून वधू-वराना मोफत पेहराव, मणी मंगळसूत्र, भांड्यांचा संसारसेट, लग्न विधीसाठी लागणारे सर्व साहित्य, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन व्यवस्था केली जाते. तसेच शासनाकडून वधू पित्यास अनुदान मिळवून देण्यास मदत केली जाते. तरी या सामुदायिक विवाह सोहळ्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभिषेक डोंगळे यांनी केले आहे. यावेळी धनाजी पाटील, राजू चौगले, सुहास डोंगळे, मुकुंद पाटील, उदय पाटील, संदीप ढेकळे, के. द. पाटील, धनाजी बरगे, संजय तिबिले, पवन गुरव आदी उपस्थित होते.