आयपीएल स्पर्धा आता मधल्या वळणावर आली आहे. मात्र अजूनही कोणत्याच संघाने प्लेऑफवर प्रबळ दावा दाखवला नाही. दिल्ली कॅपिटल्स वगळता प्रत्येक संघाने एखाद दुसरा सामना गमावला आहे. त्यामुळे अजूनही दहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं गणित कुशी बदलणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत किती सामने शिल्लक आहेत आणि पुढे किती सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल? याचं गणित मांडलं जात आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये राहण्याची धडपड सुरु झाली आहे. प्लेऑमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 16 गुण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती विजय मिळवणं भाग आहे, यावर गणित अवलंबून आहे. पण स्पर्धेत तुल्यबल सामने सामने झाले तर गणित नेट रनेरटवर अवलंबून असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 3 सामने खेळले असून 6 गुण मिळवले आहेत. अजूनही 11 सामने शिल्लक असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर 16 गुणांचं गणित सुटेल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक संधी आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 6 गुण पडले आहेत. आता 10 सामने शिल्लक असून 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तरच 16 गुणांचं गणित सुटेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सची स्थितीही गुजरात टायटन्ससारखी आहे. या संघांनी चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय मिळवला आहे. अजूनही 10 सामने खेळायचे असून पाच सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं गणित सुटणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचेही 6 गुण आहेत. पण पाच सामने खेळले आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ पैकी पाच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या पारड्यात प्रत्येकी 4 गुण पडले आहेत. पण राजस्थान रॉयल्सकडे केकेआरच्या तुलनेत एक सामना अधिकचा आहे. म्हणजेच केकेआरने 5 सामने खेळले असून तीन सामन्यात पराभव तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 4 सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. केकेआरला उर्वरित 9 पैकी 6 सामन्यात, तर राजस्थानला 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची स्थिती नाजूक आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघांच्या पारड्यात प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यामुळे या संघांनी 16 गुणांचं गणित सोडवायचं म्हंटलं तर 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे या संघांना आता पुढच्या प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई आहे.