नवजोत सिंह सिद्धू यांनी रायुडूवर पलटवार करताना धोनीला सरडा म्हटलं? पाहा व्हीडिओ
GH News April 09, 2025 10:10 PM

चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात (IPL 2025) आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. चेन्नईने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. चेन्नईला त्यापैकी फक्त 1 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर सलग 4 सामने गमवावे लागले आहेत. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अंबाती रायुडूला ट्रोल केलं जात आहे. रायुडू आयपीएल स्पर्धेत चेन्नई टीमकडून खेळायचा आणि सध्या कॉमेंट्री करत आहे. रायडू ज्या पद्धतीने कॉमेंट्री करतो त्यावरुन तो कॉमेंटेटर कमी आणि चेन्नईचा प्रवक्ता जास्त वाटतो, अशी टीका त्याच्यावर केली जात आहे.

मंगळवारी 8 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कॉमेंटटेर्स अंबाती रायुडू आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळालं. सरडा कुणाचा आराध्यदैवत असेल तर तुझा, अशा शब्दात सिद्धूंनी रायुडूला ऑन कॅमेरा सुनावलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की विषय काय?

रायूडु आणि नवजोत सिंह सिद्धू दोघेही कॉमेंट्री करत होते.चेन्नईने शिवमच्या रुपात तिसरी विकेट गमावली. शिवम आऊट झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात येत होता. तेव्हा सिद्धूंनी धोनीच्या एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिली. “धोनी आज धावत येत आहे. या वेळेस त्याचा हेतू धावण्यावरुन स्पष्ट होत आहे”, असं सिद्धू म्हणाले. यावर रायूडुने प्रतिक्रिया दिली. “हो, धोनीचा चाल बघा. ती बॅट नाही असं वाटतंय की धोनी तलवार घेऊन येत आहे. आज धोनी मैदानात तलवार चालवणार”, असं रायुडूने म्हटलं.

“गिरगिट तो तुम्हारे आराध्य…”,

रायुडूच्या प्रतिक्रियेवर सिद्धूंनी त्याची फिरकी घ्यायला सुरुवात केली. “ओए यार, तो बॅटिंग करायला येत आहे, युद्ध लढायला नाही”, असं सिद्धू म्हणाले. त्यानंतर रायुडू सिद्धूंवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतो. “इतक्या लवकर तर सरडाही रंग बदलत नाही जितक्या लवकर तुम्ही टीम बदलली”,असं रायुडू सिद्धूंना म्हणाला. आपली तुलना सरड्यासोबत केल्याने सिद्धूंचा पारा चढला आणि त्यांनी रायुडूला ऑन एअर सुनावलं. “सरडा कुणाचा आराध्य देव असेल तर तुझा आहे”, अशा शब्दात सिद्धूंनी रायुडूला सुनावलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच या व्हीडिओवरुन आता सिद्धू यांनी धोनीला सरडा म्हटलं का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान या सामन्यात पंजाबने चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवला. पंजाने चेन्नईला विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या. पंजाबसाठी 103 धावांची शतकी खेळ करणारा प्रियांश आर्या हा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.