Tahawwur Rana : ब्रेकींग ! 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं, लवकरच चौकशी होणार
Sarkarnama April 10, 2025 09:45 PM

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसैन राणाला आज (दि.१०) भारतात आणले आहे. एनआयए आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानाने तहव्वूरसोबत रवाना झाले होते. अखेर तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचे पथक भारतात दाखल झाले आहे. त्याला कडक सुरक्षेत भारतात आणलं गेलं आहे.

थोड्याच वेळात त्याला एनएआय'च्या मुख्यालयात नेलं जाणार आहे. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे. एनआयए मुख्यालयातील इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये केवळ 12 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. हा सेल तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे. ज्यांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.

सर्वात आधी तहव्वुर राणाला 26/11च्या हल्ल्याप्रकरणी एनआयए आपल्या कस्टडीत घेईल. त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला आणलं जाईल. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून त्याची रिमांड मागितली जाईल. तहव्वुर हुसैन राणा याच्या एनआयए कोर्टातील हजेरीपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राणा पालम विमानतळावरुन बुलेटप्रुफ वाहनातून राष्ट्रीय तपास संस्थेच्या(NIA) मुख्यालयात पोहचणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला सतर्क ठेवण्यात आले आहे. विमानतळावर SWAT कमांडोची सुरक्षा आधीच तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांची अनेक वाहने राणाच्या ताफ्याला एस्कॉर्ट करतील. त्याला बुलेटप्रुफ गाडीतून नेलं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणाला घेऊन पथक सकाळी 9 ते 10 या वेळेत पोहोचणार होते. मात्र इंधन भरण्यासाठी मध्ये एक थांबा घेण्यात आला. त्याला कुठून एनआयए मुख्यालयात आणायचे, याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाणार आहे. स्वॅट कमांडोंना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.