इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (१० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूने दिल्लीसमोर १६४ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात बंगळुरूने गमावलेली सर्वात पहिली विकेट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बंगळुरूकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट सलामीला फलंदाजीला उतरले होते. विराट सुरुवातीला सॉल्टला साथ देत होता, कारण सॉल्ट अत्यंत आक्रमक खेळत होता.
त्याने मिचेल स्टार्क विरुद्ध तिसऱ्या षटकात ६, ४, ४, नोबॉल ४, ६, लेग बाईज १, लेग बाईज ४ अशा एकूण ३० धावा चोपल्या होत्या. त्यामुळे बंगळुरूने ३ षटकातच ५० धावांचा टप्पा पार केला होता.
चौथ्या षटकात विराटने सुरुवात चांगली केली होती. त्याने अक्षर पटेलला एक चांगला षटकार खेचला होता. पण पाचव्या चेंडूवर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सॉल्टने कव्हरच्या दिशेने शॉट खेळला होता आणि त्याला एक धाव पळून घ्यायची होती.
नॉनस्ट्रायकरवर असलेला विराटही थोडा पुढे आला, पण त्याने विपराज निगमने चेंडू पकडल्याचे पाहताच लगेचच माघार घेत सॉल्टला माघारी धाडले. त्यामुळे सॉल्ट घाईत मागे वळून परत जात असताना अडखळला आणि क्रीजमध्ये पोहचण्यापूर्वीच निगमने यष्टीरक्षक केएल राहुलकडे चेंडू फेकला. त्यामुळे केएल राहुलने त्याला धाव बाद केले. सॉल्टने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावा केल्या.
://x.com/DelhiCapitals/status/1910340915773702519तो बाद झाल्यानंतर मात्र बंगळुरूच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. त्यानंतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाहीत. विराट १४ धावा करून २२ धावांवर बाद झाला, कर्णधार रजत पाटिदारने २३ चेंडूत २५ धावा केल्या.
शेवटी टीम डेव्हिडने आक्रमक खेळ केला म्हणून बंगळुरूला १६० धावा पार करता आल्या. डेव्हिड २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला, त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. बंगळुरूने २० षटकात ७ बाद १६३ धावा केल्या.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.