सांगोला : एखादी मॅच हारला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट बॅट तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. शहाजीबापूंसाठी एकच शब्द उच्चारतो, ‘टायगर अभी जिंदा है…’ शहाजीबापूंना वाऱ्यावर सोडणार नाही. ‘हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम.. अपनी हार को जीत में बदल देंगे हम…’, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह समर्थकांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला आहे.
सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सांगोला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे आणि प्रमुख नेते, शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेला एकनाथ शिंदेंनी संबोधित केले.
हेही वाचा : ‘मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, माणुसकीला लागलेले कलंक,’ वडेट्टीवारांनी डागली तोफ
कार्यकर्त्याला विजय किंवा पराभवाची पर्वा नसतो
एकनाथ शिंदे म्हणाले, “शहाजीबापूंवरील लोकांचे प्रेम पाहून एकदम ओक्के वाटत आहे. सांगोल्यात शहाजीबापूंना यश मिळाले नाही. तरी, तेच जनतेच्या मनातील नेते आहेत, हे मला माहीत आहे. एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीमागे असतो, त्यांना काहीच चिंता करण्याची गरज नाही. कार्यकर्ता काम करणार असतो, त्यांना विजय किंवा पराभवाची पर्वा नसते.”
अनेकदा काम करून यश मिळत नसते
“सांगोल्यात साडेपाच हजार कोटी रूपये आले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते. सांगोल्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू आलटून-पालटून आमदार झाले. अनेकदा काम करून यश मिळत नसते. निराश व्हायचे नसते. लोकांनी मला काय दिले, यापेक्षा मी लोकांना काय दिले, हे लक्षात ठेवायचे असते.
‘टायगर अभी जिंदा है…’
“एखादी मॅच हारला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट बॅट तुटून पडले आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शहाजीबापूंसाठी एकच शब्द उच्चारतो, ‘टायगर अभी जिंदा है…’ शहाजीबापूंना वाऱ्यावर सोडणार नाही. हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम.. अपनी हार को जीत में बदल देंगे हम…”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंचे पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे.