इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच वनडे आणि टी२० संघाच्या कर्णधारपदी २६ वर्षीय हॅरी ब्रुकची निवड केली आहे. जॉस बटलरने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर आता इंग्लंडने ही जबाबदारी हॅरी ब्रुककडे दिली. कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच हॅरी ब्रुकची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हॅरी ब्रुकने काही महिन्यांपूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
खरंतर त्याला आयपीएल २०२५ साठी दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण स्पर्धेच्या आधी त्याने महत्त्व द्यायचं असल्याचे कारण सांगत माघार घेतली. आता आयपीएल २०२५ पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार त्याच्यावर आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या बंदीची तलवार लटकत आहे.
पण, याबद्दल बोलताना ब्रुकने म्हटले आहे पैशांपेक्षा त्याच्यासाठी इंग्लंडसाठी खेळणे महत्त्वाचे आहे. हॅरी ब्रुक म्हणाला, 'जर नियम असेल आणि माझ्यावर बंदी येणार असेल, तरी ठीक आहे. मी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहे. अर्थात त्यासाठी मग फ्रँचायझी क्रिकेट काही काळ मागे पडत असेल, तरी ठीक आहे.'
तो पुढे म्हणाला, मला इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायचे आहे की गेल्या काही वर्षात ज्याप्रमाणे माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याप्रमाणे यापुढेही करायचे आहे. आशा आहे की मी संघाला पुढे नेताना मोठा प्रभाव पाडू शकेल.'
तसेच क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहाता, त्याने म्हटले की त्याला सर्व दिवशी खेळायची आवश्यकता असेल, तर तो खेळेल. पण जर कधी विश्रांतीची गरज वाटली, तरी तो विश्रांती घेईल.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार ब्रुकने त्याच्या नेतृत्व शैलीबद्दल सांगितले, 'मी शक्य तेवढे माझ्यापद्धतीने करेल. शांत राहिल, खेळाचा आनंद घेईल. तुम्ही इंग्लंडसाठी खेळत आहात, तर हे स्वप्न मी जगतोय. १० वर्षांचा मी आत्ताच्या मला पाहात असेल, तर मी खूप खुश असतो. मला ड्रेसिंग रुममध्ये वेगळे वातावरण निर्माण करायला मिळेल, ज्याची स्वप्न अनेक लोक बघतात, ते काम करायला मला मिळतंय.'
याशिवाय ब्रुकने असेही स्पष्ट केले की बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोसाठी वनडे व टी२० संघाचे दरवाजे बंद झालेले नाहीत.
ब्रुकची कारकिर्दब्रुकने आत्तापर्यंत २४ कसोटी सामने खेळले असून ५८.४८ च्या सरासरीने ८ शतके आणि १० अर्धशतकांसह २२८१ धावा केल्या आहेत. त्याने २६ वनडेत ८१६ धावा त्याने केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ४४ टी२० सामन्यांमध्ये ४ अर्धशतकांसह ७९८ धावा केल्या आहेत.