इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघ संघर्ष करत आहे. त्यांना आत्तापर्यंत ५ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. अशातच आत चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला. त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर पुन्हा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
ऋतुराजला ३० मार्च रोजी गुवाहाटीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध फलंदाजी करताना डाव्या हाताच्या कोपराला तुषार देशपांडेने गोलंदाजी केलेला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याच्या कोपरामध्ये फ्रॅक्चर झाले आहे. यामुळेच ऋतुराजला या हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळे ४३ वर्षीय धोनीने पुन्हा नेतृत्वाची धूरा सांभाळली आहे.
दरम्यान, आता आयपीएल २०२५ मधून बाहेर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने सांगितले आहे की तो जरी आयपीएलमधून बाहेर झाला असला, तरी तो संघासोबत असणार आहे.
सोशल मीडियावर ऋतुराजचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया देताना ऋतुराज म्हणाला, 'हॅलो, ऋतुराज बोलतोय. दुर्दैवाने झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल हंगामाला मुकावे लागणार असल्याने खूप वाईट वाटत आहे. पण आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.'
'हो, आम्ही सध्या संघर्ष करत आहोत, पण आता तरुण यष्टीरक्षक (एमएस धोनी) संघाचे नेतृत्व करणार आहे. आशा आहे की गोष्टी बदलतील. मी संघासोबत असणार आहे आणि त्यांना खरंच पाठिंबा देत राहणार आहे.'
'नक्कीच मला आत्ता जी परिस्थिती आहे, त्यातून संघाला बाहेर काढायला आवडले असते. पण तुम्हालाही माहिती आहे की काही गोष्टी नियंत्रणात नसतात. मी म्हटल्यानुसार मी संघाला डगआऊटमधून पाठिंबा देत राहणार आहे आणि आशा आहे की आमच्यासाठी उर्वरित हंगाम चांगला असेल, आभारी आहे.'
ऋतुराजने त्याला चेंडू लागल्यानंतरही खेळणे सुरू ठेवले होते. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतकही केले होते. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सविरुद्धही खेळला. पण त्याला फार काही करता आले नव्हते. दरम्यान, आधी त्याच्या कोपराच्या काढलेल्या एक्स-रेमधून काहीच कळत नसल्याने एमआरआय करण्यात आला, त्यात त्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाल्याचे चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.
ऋतुराज चेन्नईच्या फलंदाजी फळीतील प्रमुख खेळाडू आहे. पण आता चेन्नईला यापुढे त्याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. त्याने या हंगामात ५ सामन्यांत १२२ धावा केल्या होत्या.
दरम्यान, एमएस धोनी आता २०२३ नंतर पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने गेल्यावर्षी ऋतुराजच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती. ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने गेल्यावर्षी ७ विजय आणि ७ पराभवांसह पाचवे स्थान मिळवले होते.