मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवरील आयातशुल्कास तीन महिन्यांसाठी स्थगिती दिल्यानंतर आज आशियायी आणि युरोपीय शेअर बाजारांनी आठ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे उद्या (ता.११) भारतीय शेअर बाजार देखील तीन ते चार टक्के नफा दाखवून पडझडीपूर्वीच्याच पातळीवर जातील अशी चिन्हे आहेत.
ट्रम्प यांच्या बहुचर्चित वाढीव आयातशुल्क अंमलबजावणीची मुदत जवळ आल्यानंतर जगातील सर्व शेअर बाजार तीन ते चार दिवसांत जवळपास आठ ते दहा टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. मात्र काल ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवरील आयातशुल्कास स्थगिती दिली. जगातील सर्वच शेअर बाजारांनी आज त्याचे स्वागत केले. आज भारतीय शेअर बाजार बंद असले तरी आजचे चार कल बघता उद्या निफ्टी ७०० ते ८०० अंशांपर्यंत नफा दाखवीत उघडेल म्हणजेच सेन्सेक्सदेखील दोन ते अडीच हजार अंश वाढ दाखवीत उघडेल अशी चिन्हे आहेत.
आज जपानचा ‘निक्की’ साडेआठ टक्के तर तैवानचा निर्देशांकही साडेआठ टक्के नफा दाखवीत बंद झाला. त्याखालोखाल कोरियाचा ‘कोस्पी’ सहा टक्क्यांपेक्षा जास्त, सिंगापूरचा ‘स्ट्रेट टाइम्स’ पाच टक्क्यांपेक्षा जास्त, थायलंड आणि इंडोनेशिया यांचे निर्देशांकही चार ते साडेचार टक्के वाढ दाखवीत बंद झाले. शांघाय निर्देशांक एक टक्क्यांपेक्षा जास्त आणि हॉंगकॉंगचा निर्देशांक दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दाखवीत बंद झाला. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीचे युरोपीय शेअर बाजार देखील सकाळच्या व्यवहारात चार ते पाच टक्के नफा दाखवीत उघडले होते. हा कल पाहता उद्या भारतीय शेअर बाजार देखील गुंतवणूकदारांना भरघोस नफा करून देतील अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
भारत सरकार हे प्रभावीपणे परिस्थिती हाताळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये याआधीच द्विपक्षीय व्यापार कराराच्या अनुषंगाने वाटाघाटी झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार पाचशे अब्ज डॉलरवर जाऊ शकतो. यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. याबाबत आमची बोलणी सुरू आहे.
पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री