कराड : वाठार (ता. कराड) येथून एक पाच वर्षाची चिमुकली काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाली होती. मध्यरात्री उशिरा तिचा मृतदेह वाठार येथीलच शेतात मिळून आला आहे. संस्कृती रामचंद्र जाधव असे या चिमुकलीचे नाव असल्याची माहिती कराड (Karad Police) दिली. या घटनेमुळे वाठार हादरले असून नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रात्र जागून काढली.
वाठार येथून संस्कृती जाधव ही पाच वर्षाची चिमुकली काल गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी त्याबाबतची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांनी विविध पातळीवर तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर, कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली. मध्यरात्रीनंतर तिचा मृतदेह वाठार येथीलच शेतात आढळून आला. तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला तर पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्रू आनावर झाले.
या घटनेमुळे वाठार हादरले असून नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. हा घातपात आहे की अन्य काही प्रकार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकामार्फत तपास सुरू केला आहे. काल सायंकाळपासून आज पहाटेपर्यंत पोलिस सलग याचा तपास करत आहेत.