कपड्याच्या दुकान मालकास उरुळीत जीवे मारण्याची धमकी
esakal April 12, 2025 10:45 PM

उरुळी कांचन, ता. १२ : कपड्याच्या दुकानाचे नुकसान करून मालकाला जिवे मारण्याची धमकी देत ५० हजाराची खंडणी मागण्याची घटना उरुळी कांचन परिसरातील एम. जी. रोड लगत शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. सार्थक ऊर्फ बाळा सुनील जाधव, (वय २१, रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी ओंकार सुरेश पवार (वय २५, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांचे रूबाब मेन्स वेअर नावाचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडे तीनच्या सुमारास आरोपी मद्यप्राशन करून तिथे आला. त्यावेळी त्याच्या हातात लाकडी दांडके होते. दुकानासमोरील चार पुतळे त्याने खाली पाडले. आत दुकानात प्रवेश करून त्याने काचेवर दांडके मारून दुकानाचे नुकसान करण्यास सुरुवात केली. दुकानातील कपडे बाहेर फेकले. तेव्हा मध्ये आलेले फिर्यादी ओंकार पवार यांच्याही डोक्यात आणि पायाच्या पोटरीवर दांडके मारून दुखापत केली. त्यानंतर ‘मला दुकानातील ट्रॅक पॅन्ट व ५०,००० रुपये दे नाही तर तुला जिवे मारून टाकीन’, अशी धमकी फिर्यादी यांना आरोपीने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.