पुणे, ता. १२ : स्वराज्याच्या वाटचालीतील एक अत्यंत कठीण परीक्षा असणाऱ्या ‘पुरंदरच्या तहा’ची गोष्ट शनिवारी उलगडली. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे आणि दूरदृष्टीचे दर्शन रसिकांना घडले.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ या कार्यक्रमांतर्गत शनिवारी ‘पुरंदरचा तह’ या तिसऱ्या अध्यायाचे सादरीकरण झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांनी पुरंदरच्या तहाची राजकीय पार्श्वभूमी, मुघलांची रणनीती, छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पक व्यूहनीतीने या प्रसंगाचा केलेला सामना, याची गोष्ट सादर केली.
‘सकाळ’तर्फे आयोजित ‘गोष्ट इथे संपत नाही’ या उपक्रमात शिवरायांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या घटनांवर आधारित प्रयोग ५ ते २७ एप्रिल या कालावधीत दर शनिवार आणि रविवारी सादर होत आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रांका ज्वेलर्स असून सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप’ आहेत. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर- मुकाईवाडी’, व्हीटीपी रिॲलिटी आणि ‘शिवसृष्टी थीम पार्क’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
रविवारी (ता. १३) सकाळी ९.३० वाजता ‘आग्य्राहून सुटका’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर सुरू असून नाट्यगृहावर देखील तिकिटे उपलब्ध आहेत.
मुलांना आपण मराठी बोलण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, मराठी माध्यमांच्याच शाळेत टाकले पाहिजे. आज बहुतांश मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची त्यांना सविस्तर माहिती नसते. त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होणे फार महत्त्वाचे आहे.
- ॲड. फत्तेचंद रांका,
व्यवस्थापकीय संचालक- रांका ज्वेलर्स