वीट व वाहन उद्योगामुळे बदलले गाव
esakal April 13, 2025 03:45 PM

चौफुला नुसतं नाव उच्चारलं, तरी लोकांच्या भुवया उंचावतात. येथील अंबिका तमाशा कला केंद्रामुळे चौफुल्याचे नाव राज्यभर गेले. त्याला कारणही तसंच होतं. तमाशा कला केंद्रातील एका नृत्यांगनेचे नाव एका बड्या नेत्याशी जोडले गेले अन् टीकाटिप्पणीला सुरुवात झाली. राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. १९९५ च्यानंतर चौफुला भलताच चर्चेत आला. चौफुल्याची ही एकच बाजू आहे का तर अजिबात नाही. १९९५ नंतर चौफुल्याने खऱ्या अर्थाने कात टाकायला सुरूवात केली.

बोरीपार्धी (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या दोन वॉर्डांची चौफुला बाजारपेठ. चौफुल्याचे कागदोपत्री नाव धायगुडेवाडी असून, बोरमलनाथ ग्रामदैवत आहे. हे गाव पंडिता रमाबाई यांची कर्मभूमी मानली जाते. सहकारमहर्षी व माजी आमदार काकासाहेब थोरात, दौंडचे पहिले आमदार वि. रा. पवार याच गावचे. गावात ब्रिटिशांचा लष्करी तळ होता.

चौफुला हा परिसर म्हणजे उजाड माळरान होते. शेती तर दूरच प्यायला पाणी नव्हते. स्वातंत्र्योत्तर काळात मजुरी करणे हे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन होते. १९६५ च्या दरम्यान नवीन मुठा कालव्याची खोदाई सुरू झाली. तेव्हा गावातील अनेकांनी कालव्यावर मजुरीचे काम केले. पाणी आल्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. काही जणांनी मालट्रकबरोबर विदर्भात जाऊन कडब्याच्या गाड्या भरण्याची मजुरी केली.

पुणे-सोलापूर व शिरूर-सातारा हे मार्ग येथे एकत्र आल्याने चौफुल्याची ओळख एक जंक्शन म्हणून पुढे आली. त्यामुळे येथे प्रवाशांची वर्दळ वाढली. भाऊसाहेब शेंडगे, गेनबा धायगुडे, सुधाकर जगताप, मल्हारी गडधे, दत्तात्रेय लकडे यांनी सुरू केलेला हॉटेल व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला. शरद गडधे यांचे जगदंबा हॉटेल व पिलू गडधे यांनी सुरू केलेले मांसाहारी 'रान' हा पदार्थ राज्यात प्रसिद्ध आहे.

तुकाराम शेंडगे, नारायण सरगर, बाबूराव वत्रे, शंकरराव भोसले, मच्छिंद्र पंडित, बापूराव धायगुडे, कांतीलाल भयाणी, नानासाहेब गांधी, आयुब आतार, भीमजीभाई पटेल, सीताराम गडधे, बबनराव मदने, सुदाम म्हेत्रे, रंगनाथ सुपनवर, बाळासाहेब गडधे, निसार पटेल ही येथील जुन्या काळातील व्यावसायिक मंडळी. सोमनाथ मदने यांनी पुणे जिल्ह्यातील अत्याधुनिक जीम येथे सुरू केली आहे.

वीटभट्टीमुळे बदलले अर्थकारण

१९८० च्या दरम्यान गुजरातमधील पटेल कुटुंबीयांनी येथे टिंबर मार्केटचा व्यवसाय सुरू केल्यानंतर चौफुल्याची व्यावसायिक प्रगती होऊ लागली. १९८५ च्या दरम्यान येथे काही युवकांनी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय केला. चौफुल्याला वीटभट्टीचे आगार मानले जाते. वीटभट्टीमुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे.

वीटभट्ट्यांमुळे येथील अर्थकारण बदलले आहे. भारतातील बहुतांश राज्यातील लोक येथे गुण्यागोविंदाने व्यवसाय किंवा नोकरी करताना आढळतात. गेली ४० वर्षे सातत्याने विधायक उपक्रमांसाठी परिचित असलेले श्री बोरमलनाथ मित्र मंडळ ही चौफुल्याची ओळख आहे. त्रिंबक सोडनवर मंडळाचे संस्थापक, तर तनय म्हेत्रे अध्यक्ष आहेत.

‘ऑटो हब’ नवीन ओळख

चौफुला येथे सन २००० च्या दरम्यान दत्तात्रेय काळे यांनी हीरो होंडा दुचाकीचे दालन सुरू केले. या दुचाकी विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अन्य वाहन कंपन्यांना आपलेही येथे दालन असावे, असे वाटू लागले.

दुचाकी, ट्रॅक्टर, व्यावसायिक वाहने, शेती अवजारे या विभागातील सर्वच कंपन्यांनी येथे आपली दालने सुरू केली आणि बघता बघता चौफुल्याचे ऑटो हबमध्ये रूपांतरण झाले. दिवाळी-दसऱ्याला येथे सुमारे ५० कोटी रुपयांची वाहने विकली जातात. वाहनांना पुरक असणारे अन्य व्यवसाय येथे सुरू झाले. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.

हाॅस्पिटलची मोठी संख्या

चौफुल्याच्या तीन किलोमीटरच्या परिसरात हाॅस्पिटलची मोठी संख्या आहे. येथे कॅन्सर, हृदयरोग, डायलिसीस या सारख्या अवघड उपचारांसाठी आता पुणे येथे जाण्याची गरज पडत नाही. बारामती, पुणे, लोणी काळभोर येथे मोठी हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलची अंतरे जास्त असल्याने चौफुला परिसरात मोठी हॉस्पिटल विकसित होत आहे.

शहरांच्या तुलनेत येथे अल्पदरात उपचार होतात. त्यामुळे दौंड, बारामतीचा पश्चिम पट्टा, पुरंदर, शिरूर तालुक्यातील रुग्णांची येथील रुग्णालयांसाठी पसंती आहे. येथील वैद्यकीय व्यवसायातील संधी ओळखून चौफुला येथील पालकांनी आपल्या पाल्यांना वैद्यकीय शिक्षण दिले आहे. आज चौफुल्यात सुमारे ३५ स्थानिक डॉक्टर आहेत.

गैरधंदे रोखले

जुन्या काळात ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणआबा सोडनवर गावचा कारभार पाहत तर खंडूआण्णा धायगुडे तंटे मिटवत असत. माजी सरपंच आनंद थोरात यांचा गावात अद्याप दबदबा आहे. पूर्वीच्या काळी हवेलीतील गुंडांची दौंड तालुक्यात मोठी दहशत होती. अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी लाटल्या होत्या. मात्र, या गुंडांनी बोरीपार्धीमध्ये कधी पाय ठेवला नाही.

याचे श्रेय येथील ग्रामस्थ आनंद थोरात यांना देतात. दौंड शहरातील काही गुंडांनी चौफुल्यात जुगाराचे धंदे सुरू केले होते. तोंडी सांगूनही न ऐकल्याने थोरात यांनी स्वतः त्यांना चोप दिला, तेव्हा जुगार बंद झाला. २००३ मध्ये चौफुल्यात सुरू झालेला लेडीज बार बंद करण्यात थोरात व येथील युवकांचे मोठे योगदान आहे.

परंपरा जोपासण्याचा प्रयत्न

कालौघात अनेक लोककला लोप पावत चाललेल्या आहेत. नवीन पिढी लोककला जोपासण्याबाबत उदासीन असल्याचे सार्वत्रिक चित्र असताना चौफुल्यात मात्र शालेय विद्यार्थी गजनृत्याची परंपरा जोपासत आहेत. या लोकनृत्याला सहा हजार वर्षांची परंपरा आहे.

जुन्या पिढीतील गजनृत्यात पारंगत असणारे मारुती कामा कोकरे व लक्ष्मण गडधे ही कला नव्या पिढीला शिकवत आहेत. त्यांना अंकुश शेंडगे व दादा गडधे यांची साथ मिळत आहे. येथील ३०-३५ वयातील बैलगाडा शौकीन युवकांनी एकत्र येत गेल्या जानेवारीत दौंड तालुक्यातील पहिली बैलगाडा शर्यत भरवली. युवकांनी या शर्यतीसाठी मोठी मेहनत घेतली.

या शर्यतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शर्यतीत ३१६ बैलगाड्यांनी सहभाग घेतला. या युवकांमुळे तालुक्याने बैलगाडा शर्यतीचा थरार प्रथमच अनुभवला. कुस्ती संघटक हाबाजी कोल्हटकर व शिवाजी राऊत, प्रशिक्षक राहुल हेगडे यांनी ज्येष्ठ प्रशिक्षक हनुमंत हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौफुल्यात राजर्षी शाहू महाराज कुस्ती संकुलाची पायाभरणी वर्षापूर्वी केली आहे.

सुमारे ४० छोटे मल्ल येथे कुस्तीचे धडे घेत आहेत. सोशल मीडिया व ऑनलाइन गेमच्या जमान्यात विद्यार्थ्यांकडून शड्डूचा आवाज येथे घूमू लागला आहे. या संकुलाने नुकतेच कुस्तीचे मैदान भरविले होते.

मोदींच्या हस्ते गौरव

मुलींच्या शिक्षणाची हेळसांड होते म्हणून चौफुल्यात अप्पासाहेब सोडनवर यांच्या संकल्पनेतून सन २००० मध्ये काकासाहेब थोरात विद्यालय सुरू झाले. ग्रामस्थांच्या मदतीने हे विद्यालय तब्बल २३ वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर चालले. अल्प पगारावर शिक्षकांनी मुले घडवली. मल्हारी नारनोर येथील मुख्याध्यापक आहेत.

या शाळेतील पहिल्या बॅचची विद्यार्थिनी हालिमा कुरेशी हिला उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शेंडगे, कोळपे, काळे परिवाराने येथील शाळांसाठी आपल्या लाख मोलाच्या जमिनी दिल्या आहेत. नगररचनाकार दत्तात्रेय काळे व शिक्षक महादेव शेलार यांच्या अथक प्रयत्नाने प्राथमिक शाळेसाठी तीन एकर सरकारी जागा मोफत मिळाली आहे.

तीनशे गायींचे संगोपन

चौफुल्यात बोरमलनाथ देवस्थानच्या वतीने ३०० गायींची गोशाळा गेली २० वर्ष चालविली जाते. या शाळेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. मंदिराचे पुजारी कैलास शेलार स्वखर्चाने ही गोशाळा चालवतात. परिसरातील दानशूर मंडळी अधूनमधून मदत करतात. पण ही संख्या वाढण्याची गरज आहे. अनुदान नसल्याने गोशाळेवर आर्थिक ताण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.