मुलांना राग येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण मुलं जर वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतील किंवा लवकर रागावत असतील तर मुलं कमी सहनशील असल्याचे लक्षण असू शकते. या स्थितीमुळे बरेच पालक तणावात असतात, परंतु अशा परिस्थितीत मुलांना फटकारणे किंवा जबरदस्तीने शांत करणे ही समस्या आणखी वाढवू शकते. मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन करून, त्यांच्यात संयम आणि भावनिक संतुलन विकसित होते. ज्या मुलांना लवकर राग येतो त्यांना कसे हाताळायचे याबद्दल आज जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.
धीर धरा आणि समजून घ्या –
मुलांच्या वर्तनावर त्यांच्या पालकांचा प्रभाव असतो. जर तुम्ही स्वतः संयम आणि शांतता राखली तर मूलही तेच शिकेल. त्याला फटकारण्याऐवजी, प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
रागामागील खरे कारण जाणून घ्या –
मुलांचा राग हा भूक, थकवा, झोपेचा अभाव, असुरक्षितता किंवा भावनिक असंतुलन यासारख्या अनेक कारणांमुळे असू शकतो. जेव्हा जेव्हा मुलांना राग येतो तेव्हा प्रथम त्यामागील खरे कारण समजून घ्या आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा.
संभाषणाला प्रोत्साहन द्या-
मुलांना त्यांच्या भावना शब्दांत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्यांना शिकवा की राग येणे हा सामान्य मानवी स्वभाव आहे, परंतु तो योग्य पद्धतीने व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
मुलांची ऊर्जा योग्य दिशेने वळवा –
खेळ, धावणे, योगा, सायकलिंग किंवा इतर सर्जनशील क्रिया करण्यामध्ये मुलांची ऊर्जा वळवा.
खोल श्वास घेण्याचे तंत्र शिकवा-
जेव्हा तुमच्या मुलाला राग येतो तेव्हा त्याला काही सेकंदांसाठी खोल श्वास घेण्यास सांगा. ताण कमी करण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे.
स्क्रीन टाइम मर्यादित करा –
जास्त मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम पाहिल्याने मुले चिडचिडी होऊ शकतात. यासाठी मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा आणि त्यांना पुस्तके वाचणे, चित्रकला इत्यादी क्रिया करण्यास प्रोत्साहित करा.
प्रत्येक कामासाठी एक दिनचर्या तयार करा –
मुलांची एक पद्धतशीर दिनचर्या असावी ज्यामध्ये पुरेशी झोप, संतुलित आहार आणि खेळण्यासाठी वेळ यांचा समावेश असावा.
चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन द्या –
जेव्हा तुमचे मूल शांतपणे वागते तेव्हा त्याची प्रशंसा करा. यामुळे त्याला चांगले व सकारात्मक वागण्यासाठी अधिक हुरूप मिळेल.
राग व्यक्त करण्याचे विविध मार्ग शिकवा –
जर मुल रागात वस्तू फेकत असेल किंवा भांडत असेल तर त्याला त्याचा राग व्यक्त करण्यासाठी काही चांगल पर्याय द्या जसे की मनातल्या भावना कागदावर लिहून काढणे, चित्र काढणे इत्यादी.
त्यांना प्रेम आणि सुरक्षितता जाणवू द्या –
बऱ्याचदा मुले असुरक्षित वाटल्यामुळे रागावतात. अशा परिस्थितीत, त्यांना हे जाणवून द्या की तुम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहात.
हेही वाचा : Religious Tips : सुखसमृद्धीसाठी दररोज करावेत हे उपाय
संपादित – तनवी गुडे