पिढी बदलते तसे खेळाडूही बदलतात आणि प्रत्येक संघाला संक्रमणातून जावे लागते. कालचक्राच्या या वर्तुळातून कोणाची सुटका नाही. त्यामुळे ज्या संघाची संक्रमणाची ही प्रकिया सुरळीत होते, त्या संघाच्या प्रगतीचा आलेख तसाच सुरू राहतो किंवा वरही जात असतो; पण कुठेतरी एक पायरी चुकली तर घसरगुंडी अटळ. ही पायरी चुकण्याची अनेक कारणे असतात.
क्रिकेट विश्वावर एकेकाळी वेस्ट इंडीजचे अधिराज्य होते. त्यांना हरवणे म्हणजे अशक्य असायचे. १९७०-८०च्या दशकांत महान फलंदाज गॉर्डन ग्रीनिज-डेस्मंड हेन्स, क्लाईव्ह लॉईड, ग्रेट व्हिवियन रिचर्ड्स तर ज्युएल गार्नर, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स आणि मायकेल होल्डिंग असे भयंकर वेगवान गोलंदाज यांच्यासमोर विजयाचा विचार करणे कठीण असायचे.
(अजित वाडेकर यांच्या भारतीय संघाने १९७१ मध्ये विंडीजमध्ये मालिका जिंकण्याचा पराक्रम केला हा एकमेव अपवाद.) त्यानंतर आता बराच कालावधी लोटला तरी आताचा वेस्ट इंडीज संघ एकदिवसीय, ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेस पात्रही ठरत नाही. याचीही अनेक कारणे असतील; पण संक्रमण होत असताना त्यांच्या अनेक पायऱ्या चुकल्या, हे मात्र खरे.
स्टीव वॉच्या नेतृत्वाखाली खेळलेला ऑस्ट्रेलियाचा संघही असाच अजेय होता. मॅथ्यू हेडन, मार्क वॉ, ॲडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा हे खेळाडू पाठोपाठ निवृत्त झाले तेव्हा ऑस्ट्रेलियालाही या स्थितीतून जावे लागले होते; पण लगेचच सावरल्यानंतर पुन्हा तसाच संघ त्यांनी उभा केला, कारण रिकी पाँटिंगने संक्रमणाचा भार स्वतःवर घेतला आणि समर्थपणे पेललाही होता.
महेंद्रसिंग धोनीने अगोदर ट्वेन्टी-२०नंतर एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर चॅम्पियन्स करंडकही उंचावला. हाच धोनी निवृत्त होत असताना त्याच्या हाताखाली तयार झालेल्या विराट कोहलीने भारतीय संघाची धुरा सांभाळली. सोबत असलेल्या रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला पुन्हा विश्वविजेते केले.
त्यामुळे कर्णधारपदात भारताचे संक्रमण व्यवस्थित झाले; पण याच धोनीचा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघ कर्णधारपदाच्या जबाबदारीत फिरून धोनीकडे परत येत आहे. या संघाने पाच वेळी आयपीएल जिंकलेली आहे. स्वतः धोनी ४३ वर्षांचा आहे. वास्तविक या वयाचे खेळाडू केव्हाच निवृत्त होतात; पण धोनी मात्र अजून खेळतोय.
कधीपर्यंत खेळायचे हा त्याचा वैयक्तिक निर्यण आहे; पण नियुक्त कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्यामुळे स्पर्धेबाहेर गेल्यावर उर्वरित स्पर्धेत पुन्हा धोनीने नेतृत्व करावे म्हणजे या महान संघाकडे दुसरा तेवढ्या ताकदीचा कर्णधार नसल्याचे स्पष्ट होते.
आयपीएलमध्ये नवा संघ तयार करायला किंवा मिनी लिलावातून नवे खेळाडू आपल्या संघात घ्यायला संधी मिळत असते; परंतु प्रत्येक फ्रँचाइझीचा आपल्या संघ बांधणीचा वेगळा विचार असतो. चेन्नई ही फ्रँचाइझी वेगळ्या धाटणीची आहे. त्यांनी ऋतुराज गायकवाडचा पर्याय तयार केला खरा; पण तो स्पर्धेबाहेर गेल्यावर त्यांच्याकडे दुसरा कर्णधार नसावा हे आश्चर्य आहे.
तसेच ऋतुराज कर्णधार असताना गोलंदाजीतील बदल असो वा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असो धोनीची इनपुट्स मौल्यवानच असतात. एकंदरीच काय तर नेतृत्वाचे आणखी पर्याय तयार करण्यात चेन्नईचा संघ मागे पडला, हे रवींद्र जडेजाच्याही उदाहणावरून स्पष्ट होते. एका मोसमासाठी जडेजाची पूर्णवेळ कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती; पण आता उपकर्णधार म्हणूनही त्याचा विचार होत नाही.
आता इतर संघांची स्थिती पाहुया...
मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माचा पर्याय हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव आहेत. विराट कोहलीने बंगळूर संघाचे नेतृत्व सोडले, आता रजत पाटीदार ही जबाबदारी सांभाळत आहे. हार्दिक पंड्या गुजरात संघ सोडून मुंबईत गेल्यावर शुभमन गिलचा पर्याय तयार होता. दिल्ली संघाला रिषभ पंत नकोसा झाला. तो संघातून दूर झाल्यावर अक्षर पटेलकडे दिल्लीने नेतृत्व दिले.
अक्षरने भारत अ संघातच काय देशांतर्गत स्पर्धांतही नेतृत्व केले नसेल. गतविजेत्या कोलकाता संघाने करंडक जिंकून देणाऱ्या श्रेयस अय्यरला नाकारले आणि भारतीय संघातून कधीच दूर झालेल्या अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली. थोडक्यात काय तर प्रत्येक संघ पुढचा विचार करत असताना चेन्नई मात्र फिरून धोनीकडेच येत आहे.
प्रत्येक आयपीएल आली, की धोनी खेळणार, कधी निवृत्त होणार, हा प्रश्न उपस्थित केला जातो. गेल्या काही आयपीएलमध्ये सातत्याने आलटून पालटून विचारण्यात येणारा हा प्रश्न धोनी खुबीने टाळतो आणि नवा मोसम आला तरी हा पठ्ठ्या पूर्ण जोशात तयार असतो. कारण धोनीचे निवृत्त होणे हे चेन्नईच काय; पण आयपीएललाही नकोसे आहे. आयपीएल ही चेहऱ्यावर विकली जाते.
धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नावावर टीआरपीच काय; पण तिकीटविक्रीचाही गल्ला भरला जातो. सोमवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना झाला. विराट कोहलीसाठी स्टेडियम ओव्हरप्लो झाले होते.
विराट कोहलीला पाहण्याचा मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी एक व्यक्ती २१ हजारांची दोन तिकिटे घेऊन स्टेडियममध्ये आली होती. आता चेन्नईचा सामना होईल तेव्हाही धोनीसाठी अशीच गर्दी ओसंडून वाहणार आहे. हे झाले मुंबईतील सामन्यांबाबत मग विचार करा, धोनीची किती मोठी क्रेझ चेन्नईत असेल. रजनीकांतनंतर कदाचित धोनी तेथे लोकप्रिय असेल. थाला... थलैवा... अशा नावानेही धोनीचे नाणे चेन्नईत खणखणीत वाजतेय.
हे झाले मैदानावरील अस्तित्वाबाबत. सोशल मीडियाचे उदाहरण पाहूया. आयपीएलच्या आर्थिक गणितात लोकप्रियता हा महत्त्वाचा घटक आहे आणि या लोकप्रियतेवर जाहिरातदारांचा ओघ असतो.
आजच्या मितीला अंबानी, शाहरूख खान संघांचे मालक असताना चेन्नईचा फॅन फॉलोअर्स सर्वाधिक आहे आणि हे सर्व धोनीभोवती केंद्रित झाले आहे. कारण तमिळनाडू काय आणि त्यांची राजधानी चेन्नई काय, रजनीकांत काय आणि धोनी काय या सर्वांना दैवत्व बहाल केले जाते.
धोनी पूर्ण १० षटके फलंदाजी करू शकत नाही, त्यामुळे तो कमीत कमी षटके असताना फलंदाजीस येतो, असे त्यांचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग सुरुवातीच्या काही सामन्यानंतर म्हणाले होते; मात्र याबाबत अधिक चर्चा सुरू झाल्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ लागला.
धोनी पूर्णतः तंदुरुस्त नाहीये. गुडघ्याला निपॅड लावून तो खेळतोय; पण चेन्नई संघासाठी तो खेळत राहायला हवा... या सर्व चक्रव्यूहात चेन्नई संघाची नाव यंदा भरकटली. पहिल्या पाचपैकी चार सामने त्यांनी गमावले आणि त्यात विजय कोणाविरुद्ध मिळवला तर अडखळणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध!
एकखांबी तंबू असला तर अशी गत व्हायचीच. शेवटी क्रिकेट हा खेळ सांघिक आहे आणि त्यात प्रामुख्याने आयपीएलबाबत बोलायचे तर येथे पाहिजे जातीचे यापेक्षा येथे हवेत परफॉर्म करणारे... असेच म्हणावे लागेल.