पिंपळे गुरव, ता. १२ ः पिंपळे गुरवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव व हनुमान जयंतीचा सोहळा शनिवारी (ता.१२) पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा झाला. ‘श्रीं’चा लग्नसोहळा, शाही स्नान आणि पालखी मिरवणूक हे सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
भैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष व आमदार शंकर जगताप तसेच अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने उत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उत्सवाची सुरुवात शुक्रवारी रात्री १२ वाजता श्री भैरवनाथ मंदिरात ‘श्रीं’च्या लग्नसोहळ्याने झाली. हा सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तांच्या जयघोषात पार पडला. शनिवारी सकाळी ‘श्रीं’चा अभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावाने झाला. हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सायंकाळी
शाही स्नान आणि पालखी मिरवणुकीसाठी ‘श्रीं’चे धर्मकुंडाकडे प्रस्थान झाले. पारंपरिक बैलगाड्या, बगाड, नगारा व पालखी मिरवणुकीने हा सोहळा विशेष आकर्षण ठरला. धर्मकुंडावर स्नान विधीनंतर ‘श्रीं’चा ग्रामप्रवेश करण्यात आला. रात्री नऊ वाजता छबिना मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. गावातील रस्ते विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. सर्वत्र उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
रविवारी (ता.१३) सायंकाळी पिंपळे गुरव येथील मुख्य बस स्थानकाशेजारील मैदानावर कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. पारंपरिक मातीच्या आखाड्यात नामवंत पैलवानांच्या दमदार लढती पाहण्याची संधी गावकऱ्यांना मिळणार आहे.
उत्सवाच्या संपूर्ण आयोजनात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून गावात भक्ती, परंपरा आणि हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी आकर्षक विद्युत सजावट, पोलिस बंदोबस्त, स्वयंसेवकांची नेमणूक यामुळे कार्यक्रम सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पाडले जात आहेत.
मुजरा लोककलेचा...
सूर्यमुखी गणेश मंदिराजवळील पटांगणात शनिवारी रात्री स्थानिक कलाकारांच्या सहभागाने ‘मुजरा लोककलेचा’ व ‘ढोलकीचा खणखणाट’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तरुणाईचा विशेष प्रतिसाद मिळाला.
PMG25B02268