Maharashtra Politics Live : कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यानंतर आता राजू शेट्टी करणार आंदोलन
Sarkarnama April 13, 2025 06:45 AM
कर्जमाफीसाठी राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकरी कर्जमाफीवरुन आता बच्चू कडू यांच्यानंतर राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले महायुतीने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं. हमीभावाच्या 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती, या दोन्ही घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. प्रहारने ज्याप्रकारे सत्ताधाऱ्यांच्या घरी जाऊन आंदोलन केलं तसं आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहोत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अमित शहांचे तोंडभरुन कौतुक

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ३०७ कलम हटवले. देशाच्या सीमेवर उपद्रव करणाऱ्यांना वठणीवर आले. आता ते सर्व बिळात बसले आहेत. देशात हिंसाचार फैलावणारे जे लोक होते, मग त्यात नक्षलवादी असो की अतिरेकी त्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. तहव्वूर राणा यालाही भारतात आणले, त्याला मुंबईत आणून फाशी देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

अजित पवारांना संधी मिळाली नाही

रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची ३४५ वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खास या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. अमित शाह यांच्या बरोबर पुण्यावरुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहचले. किल्ले रायगडावर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी आले होते. यावेळी एकनाथ यांना अचानक भाषणाची संधी मिळाली पण अजित पवार यांचे भाषण झालेच नाही.

Amit Shah : शिवरायांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला : गृहमंत्री अमित शाह

देशातील गुलामीची मानसिकता छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडीत काढली. स्वराज्याच स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले आहे. शिवरायांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. त्यामुळे येत्या काळात शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता येत्या काळात त्यांचे विचार संपूर्ण जगभर पोहचवण्याचे काम करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

Devendra fadnavis : काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम गेल्या काही दिवसापासून रखडलेले आहे. हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात लवकरच स्मारक कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्शील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रायगड येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

अमित शाहांचे शिवाजी महाराजांना अभिवादन रायगडच्या पायथ्याशी दाखल

रायगड दौऱ्या असलेले गृहमंत्री अमित शाह हे रायगडावर दाखल झाले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले.

पुण्यात मध्यरात्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये खलबतं

रायगड दौऱ्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते ज्या हाॅटेलमध्ये मुक्कामी होते तेथे रात्री शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा शहांच्या महाराष्ट्रा दौऱ्यातून सुटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुण्यातअचानक आंदोलन केले. रात्रीच्या आंदोलनानंतर आज सकाळी विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या मोदी बागेतील कार्यालयात गेले. तेथे शरद पवारांसोबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अर्ध्या तास केली चर्चा.त्यानंतर पवारांनी MPSC आयोगाच्या अध्यक्षांना रजनीश शेठ यांना फोन केला. शेठ यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गे लावणार असल्याचे सांगितले.

Amit Shah Raigad visit : अमित शाह, CM फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेसोबतच रायगडावर जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज 10 वाजता पुण्यातील रिट्स कार्लटन हॉटेलमधून रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत. ते आधी पुणे विमानतळावर जाणार आणि तिथून हेलिकॉप्टरने रायगडला जाणार आहेत. यावेळी यांच्यासोबतच शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडला जाणार आहेत.

Deenanath Hospital : डॉ. घैसास यांच्या अडचणी वाढल्या

पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून डॉ. सुश्रुत घैसास यांना नोटीस धाडण्यात आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने हा मृत्यू झाल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यासाठी आता डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे. त्यामुळे घैसास यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेने भाकरी फिरवली, सचिव सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

Amit Shah Raigad visit : अमित शाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज किल्ले रायगडावर येणार आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील. शिवाय अमिक शहांचा दौरा असला तरी रायगड किल्ल्यावर जाणार रोप-वे शिवभक्तांसाठी सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.