Historical Schools India: भारतातली सर्वात जुनी अन् आजही चालू असलेली शाळा कोणती असू शकेल? वाचा सविस्तर
esakal April 13, 2025 10:45 AM

Camil Parkhe

Margaret School Board: भारतात आधुनिक शिक्षणाची मुळात सुरुवात झाली ती देशात ब्रिटीशांचे अणि ख्रिस्ती मिशनरींचे आगमन झाल्यानंतर. गोव्यात पोर्तुगीज सत्ता सोळाव्या शतकात सुरु झाली तिथे मात्र हे खूप आधी झाले.

गोव्याने तेथील पोर्तुगीज सत्तेमुळे अनेक गोष्टींबाबत उर्वरीत भारतापेक्षा आघाडी मिळवली आहे. जसे मुद्रणतंत्र, मराठी भाषेतले पहिले (रोमन लिपीतले) पुस्तक, समान नागरी कायदा वगैरे.

गोव्यात ओल्ड गोव्यात जेसुईट फादरांनी सेंट पॉल कॉलेज स्थापन केले होते. आधुनिक पद्धतीचे म्हणजे लॅटिन भाषा, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, भूगोल वगैरे विषयांत शिक्षण देणारे आशियातले ते पहिले महाविद्यालय.

मुंबई बंदरात 1812 साली आलेल्या अमेरीकन मिशनरी लोकांनी मुंबईत 1814 च्या सुमारास सर्वांसाठी असलेल्या आधुनिक शाळा सुरु करुन सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मुलींची पहिली शाळा 1824 साली सुरु केली.

स्कॉटिश मिशनरी डोनाल्ड मिचेल यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १८२३ नंतर कोकणात हर्णै, बाणकोट आणि दापोली येथे शाळा सुरू केल्या.

जेम्स मिचेल यांच्या पहिल्या पत्नीने कोकणात शाळा सुरु केल्या होत्या. मात्र केवळ `फर्स्ट मिसेस मिचेल; किंवा `बाणकोटच्या मिसेस मिचेल' म्हणूनच आज त्यांची इतिहासात ओळख राहिली आहे.

दुदैवाने दापोली येथे १८२७ साली या `फर्स्ट मिसेस मिचेल' यांचे निधन झाले.

इतर स्कॉटिश मिशनरींनी पुण्यात 1827 साली शाळा सुरु केल्या. त्यापैकी आजही चालू असलेली पुणे कॅम्पात एक शाळा आहे

सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळा. स्थापना सहा जानेवारी 1827.

एकेकाळच्या घाशीराम कोतवाल यांच्या गढी किंवा वाड्याला - आताच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअरला (AFMS) - अगदी लागून.

आजची ओळख म्हणजे प्रसिद्ध बिशप स्कूलच्या मागच्या बाजूला असलेल्या खेळाच्या मैदानाला लागून ही शाळा आहे. प्रीत मंदिराच्यासमोर.

पुण्यातली, महाराष्ट्रातली आणि बहुधा भारतातली ही सर्वात जुनी अणि आजही चालू असलेली शाळा असू शकेल. याकडे संबंधित क्षेत्रातील लोकांचे लक्ष गेलेले नाही हे मात्र खरे.

इथल्या शाळेच्या बैठ्या खोलीची स्थिती, आवारातील इतर पडीक,कौलारी आणि भग्न बांधकाम पाहता या शाळेचे हे आगळेवेगळेपण कुणाला कळणारसुद्धा नाही.

तर या जागेत आणि इथल्या वास्तूत स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल 1831 नंतर राहत होते.

जेम्स मिचेल यांच्या स्कॉटीश मिशनरी शाळेत जोतिबा फुले शिकले. नंतर काही काळ या शाळांत ते शिक्षक सुद्धा होते असे त्यांनी सर विल्यम शिक्षण आयोगाच्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेतून भारतात मिशनकार्यासाठी आलेल्या मार्गरेट शॉ यांचा पुण्यात जेम्स मिशेल यांच्याशी १८४२ साली विवाह झाला.

याच मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांनी अध्यापनाचे धडे गिरवले.

आपली एक शाळा आपण नंतर मिसेस मिचेलकडे चालवण्यासाठी सुपूर्द केली असे जोतिबांनी हंटर कमिशनच्या निवेदनात म्हटले आहे.

जोतिबा आणि सावित्रीबाईंचा सेंट मार्गारेट शाळेच्या या आवारात विविध कारणांनी खूप वावर असणार याबद्दल शंका नसावी .

अर्थात आजची सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळेच्या सद्याच्या खोल्या खूप नंतरच्या. 1866 च्या.

जेम्स मिचेल यांचे १८६६ साली माथेरान येथे निधन झाले होते. मिसेस मिचेल नंतर स्कॉटलंडला परतल्या होत्या.

सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा दोन वर्षानंतर म्हणजे २०२७ला दोनशे वर्षे पूर्ण करेल. आधी ही शाळा सातवीपर्यंत होती,

मराठी शाळेतील मुलामुलींची संख्या सगळीकडे झपाट्याने कमी होत असल्याने आता ही शाळा फक्त चौथीपर्यंत आहे.

आता मुलांमुलींची एकूण पटसंख्या केवळ ७०.

शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची एकूण संख्या केवळ पाचसहा.

खेदाची बाब म्हणजे सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या काळात असणार तशीच ही शाळा आजही आहे. इथली मुले आजही समाजाच्या खालच्या स्तरातील आहेत.

जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या काळात मुलेमुली या शाळेत शेणामातीने सारवलेल्या जमिनीवर बसत असत, आता ही मुलेमुली फरशीवर बसतात एव्हढाच काय तो फरक.

शेजारच्या बिशप स्कूलसारखे येथे बसायला खुर्चीबाके नाहीत आणि मोजेबुटांचा समावेश असणारा स्मार्ट युनिफॉर्मही नाही.

सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळेच्या सत्तरच्या दशकात मुख्याधिपिका असलेल्या, नंतर मार्गारेट विल्सन यांनी १८३२ साली मुंबईत सुरु केलेल्या सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि अखेरीस एथेल गॉर्डन कॉलेजच्या प्राचार्य असलेल्या विजया पुणेकर यांनी सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळेचा संक्षिप्त इतिहास लिहिला आहे.

तर काल एप्रिल ११ रोजी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेत जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

स्कॉटीश मिशनच्या म्हणजे सद्याच्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यात आता चार शिक्षणसंस्था आहेत:

सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा, पुणे कॅम्पातली मार्केटसमोरची सेंट जॉन सेकंडरी स्कुल, लाल देवळाजवळची सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कुल आणि क्वार्टर गेटशेजारच्या एथेल गॉर्डन प्राथमिक शाळांच्या माजी विद्यार्थींनी एकत्र येऊन आपल्या शाळेतील एका महान विद्यार्थ्यांची - जोतिबा फुले - यांची जयंती साजरी केली.

यासाठी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळाच्या प्रभारी मुख्याधिपिका अनुपमा कलकोटी, एलिझाबेथ विधाते, सेंट जॉन सेकंडरी स्कुलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे राजाभाऊ चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता.

पुणे धर्मप्रांताचे बिशप आल्फ्रेड तिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला एथेल गॉर्डन कॉलेजच्या प्राचार्या शिल्पा पंडित, सेंट जॉन सेकंडरी स्कुलचे मुख्याध्यापक प्रणित कसोटे, सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कुलच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे, पत्रकार आसिम शेख, माजी विद्यार्थी जयप्रकाश आढाव हजर होते.

स्कॉटीश मिशनच्या पुण्यात चालू असलेल्या या चार शाळांतील नेमक्या कुठल्या शाळेत जोतिबा शिकले, कुठल्या शाळेत सावित्रीबाई शिकल्या, कुठल्या शाळेत जोतिबा शिक्षक होते हे संशोधकांनी शोधून काढावे असे आवाहन सेंट जॉन सेकंडरी स्कुलचे माजी विद्यार्थी राजाभाऊ चव्हाण यांनी केले आहे.

तर जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या वावराने पावन झालेल्या या आवारात पाऊल ठेवताना मी अनुभवलेल्या भावनांचे वर्णन करता येणार नाही.

स्कॉटीश मिशनच्या पुण्यात चालू असलेल्या या चार शाळांतील नेमक्या कुठल्या शाळेत जोतिबा शिकले, कुठल्या शाळेत सावित्रीबाई शिकल्या, कुठल्या शाळेत जोतिबा शिक्षक होते हे संशोधकांनी शोधून काढावे असे आवाहन सेंट जॉन सेकंडरी स्कुलचे माजी विद्यार्थी राजाभाऊ चव्हाण यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.