भुरळ 'वडापाव'ची!
esakal April 13, 2025 11:45 AM

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पनवेल सोडले की साधारण आठ किलोमीटरवर शेडुंग फाटा लागतो. या फाट्यावरून आत जाण्याचं कारण म्हणजे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणारा कलावंतीण दुर्ग आणि प्रबळमाची. डोंगरभटक्यांसाठी हा नेहमीचा रस्ता.

कलावंतीण दुर्ग अवघ्या २,२५० फूट उंचीवर असल्याने निवांतपणे चढूनही अवघ्या तीन-चार तासांत वर पोहोचता येते. उन्हाळ्यात उंचच उंच काळा पाषाण आणि पावसाळ्यात धुके-ढगांचे पांघरूण अंथरलेला हा सुळका महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करत असतो.

त्यावर चढाई करणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही, म्हणून ‘दुरून डोंगर साजरे’ या उक्तीनुसार कित्येकजण लांबूनच त्याचे दर्शन घेत असतात; मात्र कलावंतीणच्या मार्गाला लागण्याआधी शेडुंग फाट्यावरील ‘श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर’वर ट्रेकर्ससोबतच तिथून जाणाऱ्या प्रत्येकाने कधी ना कधीतरी हा थांबा घेतलेलाच असतो.

गेली पंचेचाळीस वर्षे तिथून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी हा थांबा जणू सक्तीचाच झाला आहे. ‘वडापाव’ हा एकमेव पदार्थ या थांब्यावर मिळतो; पण त्याच वडापावने लोकांना अशी काही भुरळ पाडलेली आहे की फक्त तो वडापाव खाण्यासाठी लोकं सहकुटुंब वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून येतात आणि परत जातात.

नवीन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे जुन्या महामार्गाचे महत्त्व कमी झाले असले तरी एकेकाळी या रस्त्याची वेगळीच शान होती. याच रस्त्यावर असलेल्या शेडुंग फाट्यावर १९८० साली एका टेबलावर एक धंदा सुरू झाला. नामदेव महादेव पाटील हे शेडुंग गावातील शेतकरी. चार अपत्ये असलेले नामदेव भाजीपाल्याची शेती करायचे आणि त्यावर कुटुंबाची गुजराण होत असे.

काम करणारे हात दोन आणि खाणारी तोंडे दहा म्हणून नामदेव यांनी शेतीला जोडधंदा करता येतोय का, याचा विचार सुरू केला. अपुरे शिक्षण, बेताची आर्थिक परिस्थिती आणि कामाचा कुठलाही अनुभव गाठीशी नसल्याने गावाच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गाड्या आणि माणसांना गृहीत धरून वडापावचा धंदा करण्याचे ठरवले. मूळ गुंतवणूक कशी करणार या विचारात असताना गावातील मेस्त्री गुरुजी मदतीला धावून आले आणि त्याकाळी त्यांनी नामदेव यांना ४०० रुपयांची आर्थिक मदत केली.

पत्नीच्या मदतीने नामदेव सर्व कच्चा माल घरी तयार करत आणि डोक्यावरून सर्व सामान घेऊन जाऊन शेडुंग फाट्याच्या कडेला टेबलावर धंदा लावत. हळूहळू जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडू लागली. गाड्या थांबू लागल्या आणि वडापावची चव लोकांच्या पसंतीस उतरू लागली. त्याकाळी रॉकेलच्या स्टोव्हवर वडापाव तयार केला जायचा.

सुरुवातीपासूनच गिऱ्हाईक आलं की वडापाव गरमागरम बनवून देण्याचा शिरस्ता आजही कायम आहे. त्यामुळे इथे ताजा आणि गरमागरम वडापावच मिळणार, याची लोकांना खात्री असते. साहजिकच लोकांची थांबायची तयारी असते.

पंचवीस वर्षे मेहनत आणि विश्वासाच्या बळावर धंद्याचा जम बसवल्यानंतर नामदेव पाटील यांचे निधन झाले. अर्थात त्यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा गणेश याने धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्याच्यापाठोपाठ संतोष, दशरथ आणि प्रमोद ही सख्खी धाकटी भावंडेदेखील मदतीला आली. आजघडीला संपूर्ण पाटील कुटुंब मिळून हा धंदा करतं.

इथे एकही बाहेरचा कामगार कामाला नाही. एकूण सोळा जणांच्या एकत्र कुटुंबातील प्रत्येकजण या धंद्यामध्ये आपलं योगदान देतं. चारही भाऊ ग्राहकांना थेट वडापाव बनवून विकण्याचं काम करत असले तरी त्याच्या पूर्वतयारीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी खांद्यावर घेतलेली आहे.

बटाटे उकडणे, बटाटा वड्याचा मसाला, चटण्या, कापणे, चिरणे, सोलणे, कुटणे, वाटणे या कामांना सकाळी साडेपाच वाजता सुरुवात होते. दिवसभरात लागेल तितकाच माल तयार केला जातो. त्यातही बटाटा वड्याचा मसाला म्हणजेच ठेचा दिवसातून तीन वेळा तयार होतो. या ठेच्यामध्ये धंद्याचं सारं गुपीत लपलेलं आहे.

वरवर मिरचीचा ठेचा वाटणारा हा मसाला हिरवी मिरची, आलं, लसून, जिरं, मोहरी, हळद, धणे असे मोजकेच जिन्नस वापरून तयार केला जात असला तरी प्रत्येक गोष्टीच्या योग्य प्रमाणातून हा जादुई ठेचा जन्माला येतो. आजवर अनेकांना त्यात काय काय घातलं जातं याची चौकशी करून तो बनवायचा प्रयत्न केला; पण कुणालाही ते शक्य झालेलं नाही.

या ठेच्याचं वैशिष्ट्य म्हणजे तीन बोटांच्या चिमटीत जितका ठेचा उचलता येईल त्यात किमान दहा वडे तयार होतात आणि त्याच ठेच्यात चिमूटभर मीठ घालून तो भाकरीसोबतही खाता येऊ शकतो. ज्यांना तिखट खायची सवय आहे त्यांनी आग्रह केल्यास वडापावसोबत ठेचा दिला जातो.

बटाटा वडा तयार करण्यासाठी शिजवून कुस्करलेला बटाटा तयार असतो. त्यामध्ये ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ टाकलं जातं. सर्व गोष्टी एकजीव करून छोटे गोळे तयार करून त्या गोळ्याला दोन हातांच्या तळव्यांनी हलकेच दाबले जाते. चारही पाटील भावंडे आता इतकी तरबेज झाली आहेत की कुणीही वडा तयार केला तरी मशीनमध्ये बनवल्याप्रमाणे प्रत्येक वड्याचा आकार सारखाच येतो.

वड्यासाठी आग्य्राचा जुना बटाटा वापरला जातो. वर्षाच्या सुरुवातीला बाजारात ओला म्हणजेच नवीन बटाटा येतो आणि साधारण जूननंतर जुना बटाटा. वड्यासाठी जुना बटाटा चांगला, असं संतोष पाटील यांचं म्हणणं आहे, कारण त्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरतो. नवीन आणि जुन्या बटाटा वड्याच्या चवीत थोडा फरक असतो, अशी प्रामाणिक कबुली संतोष देतात.

चवीप्रमाणेच कुठलाही पदार्थ तयार करणे हीदेखील एक कला आहे. साधारणपणे वडापावच्या गाडीवर गेल्यास बटाटे वडे तळण्याच्या शेगडीशेजारी पिठाचा थर साचलेला दिसतो. वडे बनवणारा पिठाने माखलेला दिसतो; परंतु इथे तुम्हाला असं काही दिसणार नाही. पिठाचा टोप, शेगडी, इतकंच काय कढईच्या काठावरही पिठाचा अभिषेक झालेला दिसत नाही.

भाजीचा वडा अलगद टोपातील पिठात टाकून तिथे दोन वेळा त्यावर पिठाचा थर चढवून चार बोटांनी हलकेच वडा खळखळत्या तेलात सोडला जातो. वड्यावर पिठाचा थरही इतका चपखल बसलेला असतो की कढईमध्ये चुरा अगदी नावाला तयार होतो.

वड्याला फिनिशिंग आणि चकाकी यावी, यासाठी पिठामध्ये खाण्याचा सोडा का टाकतो याचे सविस्तर विश्लेषण संतोष करतात. त्याचे दोन फायदे आहेत - वडा सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय होतो आणि वडा तेल धरून ठेवतो. सोड्याचे प्रमाण ठरलेले आहे, कारण ते जास्त झाले तर वड्याचे आवरण लाल होते. इथे पावाला चटणी लावून दिली जात नाही.

कागदी प्लेटमध्ये वडापावसोबत सुकी चटणी आणि तळलेली हिरवी मिरची मिळते. ज्यांना गोड चटणी हवी त्यांना वेगळी दिली जाते. सुक्या चटणीमध्ये चुरा, लसूण आणि तिखट या तीनच गोष्टी असतात आणि गोड चटणी चिंच, गूळ वापरून तयार केली जाते.

गेली पंचेचाळीस वर्षे वडापाव हा एकमेव पदार्थ इथे विकला जातोय. आपली ज्यामध्ये मास्टरी आहे, तेच आपण करावं, हा त्यामागचा विचार. त्यामुळे एकदा इथे वडापाव खाऊन गेलेली व्यक्ती पुन्हा येतेच, याची खात्री चारही भाऊ देतात. वड्यासाठी सनफ्लॉवर तेल आणि बेसन पीठ वापरलं जातं. दरदिवशी कढईत ओतलेलं तेल संपवूनच शेगडी बंद केली जाते. बटाटा, मिरची, लसूण, आलं, कोथिंबिर हा बाजार दररोज सकाळी पनवेल मार्केटमधून येतो.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा धंदा पूर्णपणे बंद होता; मात्र नंतर गिऱ्हाईकांचे फोन यायला लागले. एवढंच कशाला पोलिसांनीदेखील घरून वडापाव बनवून देण्याची विनंती केल्याची आठवण संतोष सांगतात. त्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना आमचा वडापाव आधार होता, ही एकमेव गोष्ट आणखी मेहनत करण्यासाठी बळ देते, असं पाटील कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

कंपनीत तयार होऊन पाकीटबंद होणाऱ्या कुठल्याही पदार्थांचा व्यवसाय जितका सोपा असतो त्याच्या अगदी उलट वर्षानुवर्षे केवळ एकच पदार्थ तयार करून विकण्यात जास्त जोखीम असते; मात्र पाटील कुटुंबीयांनी त्यावर सहज मात केलेली दिसते.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा जुना महामार्ग इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे एक अनोखे मिश्रण आहे. याच रस्त्यावर शेडुंग फाट्यावर १९८० साली एका टेबलावर एक धंदा सुरू झाला वडापाव गरमागरम बनवून देण्याचा. हा स्टॉल आजही सुरू आहे आणि खवय्यांना खुणावतो आहे...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.