कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या वांशिक हिंसाचारामुळे घाबरलेले शेकडो नागरिक पलायन करत असून अनेक जण भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आले आहेत. हल्ल्याची भीती असल्यानेच घर सोडून पळून आल्याची व्यथा या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने मुस्लिमबहुल मुर्शिदाबादमध्ये शनिवारी हिंसक वळण घेतले होते. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी वाहने आणि घरे जाळली आणि दुकानांवरही हल्ले केले. काही महिलांवरही अत्याचार झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या हिंसक घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुर्शिदाबादमध्ये तणावाचे वातावरण आहे. हिंसेच्या भीतीने शेकडो नागरिकांनी घरे सोडून शेजारील मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. नागरिक बोटींनी किंवा पोहत जात नदी ओलांडत आहेत.
मालदा जिल्ह्यातील प्रशासनाने हिंसाचारग्रस्त कुटुंबांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली असून, त्यांना शाळांमध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. बोटीतून येणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी किनाऱ्यावर स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. पाचशे ते नऊशे जणांनी जिल्हा सोडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘‘आम्ही धुलियनमधील मंदिरपारा भागातून पळून आलो. आमची घरे पेटवण्यात आली आणि बाहेरगावच्या व काही स्थानिकांच्या टोळीने आमच्या महिलांवर आणि मुलींवर अत्याचार केले,’’ असे एका युवतीने माध्यमांना सांगितले. आम्ही त्यांच्या पाया पडलो, क्षमा मागितली, तरी त्यांनी आमच्यावर अत्याचार केले. पळून आलो नसतो तर मारले गेलो असतो, असेही एका वृद्ध महिलेने सांगितले.
भाजपकडून टीकामुर्शिदाबादमधील हिंसाचार व नंतर नागरिकांचे पलायन यावरून भाजपने पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘‘हिंदूंना धार्मिक कारणावरून धमकावले जात आहे. बंगालमध्ये धार्मिक कारणांवरून अत्याचार होत आहे, हे वास्तव आहे. तृणमूलच्या लांगुलचालनाच्या धोरणामुळेच कट्टरतावाद्यांचे मनोबल वाढले आहे. हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या या अपयशाबद्दल राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे,’’ असे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.