आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची 18 व्या मोसमात वाईट स्थिती झाली आहे. मुंबईने या हंगामात 5 सामने खेळले आहेत. मुंबईने त्यापैकी सलग 2 आणि एकूण 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईसमोर कमबॅक करुन पुढील सामने जिंकण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईसमोर आज 13 एप्रिलला अजिंक्य असलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दिल्लीने या मोसमात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे मुंबईसमोर विजयी ट्रॅकवर परतण्यासह दिल्लीचा रथ रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.
मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या दोघांकडून चाहत्यांना मॅचविनिंग खेळीची अपेक्षा असणार आहे. रोहित या हंगामात फ्लॉप ठरला आहे. रोहितला एकाही सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे रोहितसमोर मोठी खेळी करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर आरसबीविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं. बुमराहला आरसीबीविरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. अशात बुमराहही प्रतिस्पर्धी संघाला दणका देण्यासाठी सज्ज आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स सध्या सुस्साट सुटली आहे. दिल्लीने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात विजयाचा चौकार लगावला आहे. दिल्लीने अनुक्रमे लखनौ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं आहे. त्यामुळे दिल्लीकडे मुंबईला पराभूत करत विजयी पंच लगावण्याची संधी आहे. तर मुंबईला कमबॅक करण्यासाठी दिल्लीचा रथ रोखणं गरजेचं आहे. अशात आता कोण कुणावर वरचढ ठरतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.