PBKS vs SRH Live : १८ चेंडूंत ८६ धावा! अभिषेक शर्माचे वादळी शतक, खिशातून कागद काढला, काव्याला दाखवला; काय लिहिलं होतं त्यावर?
esakal April 13, 2025 04:45 PM

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Updates: अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील वेगवान शतकाची नोंद केली. पंजाबच्या २४७ धावांचा पाठलाग करताना अभिषेकने ४९ चेंडूंत १०० धावा पूर्ण केल्या. त्याने शतक पूर्ण केल्यानंतर खिशातून पेपर काढला आणि दाखवला. त्या पेपरवर काहीतरी लिहीले होते आणि ते काय हे जाणून घेऊयात...

पंजाब किंग्सच्या तोडीस तोड खेळ सनरायझर्स हैदराबादने केला. २४६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर SRH कडून प्रतीहल्ला होईल, हे अपेक्षित होते. तसे झालेही.. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि दोघांच्या फटकेबाजीने हैदराबादचे स्टेडियम दणाणून गेले. अभिषेकला नशीबाचीही साथ मिळाली. झेल पकडला गेला, तो चेंडू नेमका NO Ball ठरला. SRH च्या दोन्ही सलामीवीरांनी चार षटकांत ६१ धावा फलकावर चढवल्या. अभिषेकने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबविरुद्ध आयपीएलमधील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. सुरेश रैनाने २०१४ मध्ये १६ चेंडूंत हा करिष्मा केला होता.

या दोन्ही फलंदाजांना रोखणे पंजाबसाठी अवघड झाले होते. दोघांनी पहिल्या १० षटकांत १४३ धावांचा डोंगर उभा करून हैदराबादचा विजयाचा मजबूत पाया रचला. हेडने ३१ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम अभिषेक-ट्रॅव्हिसने नावावर केला. साई सुदर्शन व शुभमन गिल यांनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आजच १२० धावांची भागीदारी केली होती.

ट्रॅव्हिस हेड व अभिषेक यांनी ७५ चेंडूंत १७१ धावांची भागीदारी केली. हेड ३७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर झेलबाद झाला. पण, अभिषेक थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्याने ४० चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीत ११ चौकार व ६ षटकारांचा अशा १७ चेंडूंत ८० धावांचा समावेश होता. शतकानंतर अभिषेकने खिशातून एक पेपर काढला आणि त्यावर THIS ONE FOR ORANGE ARMY असा मजकूर लिहिला होता.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील सामन्यात पहिल्या १० षटकांनंतरच्या सर्वोच्च धावसंख्या १४३ या आहेत, ज्या SRH ने केल्या. PBKS ने त्यांच्या डावात १० षटकांनंतर २ बाद १२० धावा केल्या होत्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या प्रियांश आर्या ( १३ चेंडूंवर ३६ धावा) आणि प्रभसिमरन सिंग ( २३ चेंडूंत ४२ धावा ) या जोडीने २४ चेंडूंत ६६ धावा कुटल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकांरांसह ८२ धावा करताना हैदराबादची डोकेदुखी वाढवली. त्यात मार्कस स्टॉयनिसने मोहम्मद शमीने टाकलेल्या २०व्या षटकात सलग चार षटकार खेचून पंजाबला ६ बाद २४५ धावांपर्यंत पोहोचवले. स्टॉयनिस ११ चेंडूंत ३४ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून हर्षल पटेलने ४, ईशान मलिंगाने दोन विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.