मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणात अनेक बदल दिसून आले आहेत. अशामध्ये आता हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा हा एक ते दोन अंशांनी घसरला आहे. पण, विदर्भात उष्णतेची लाट कायमच आहे. त्यामुळे आता एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update IMD alert ununseasonal rain and hailstorms heatwave some part)
हेही वाचा : Mehul Choksi : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला आणखी एक यश, मेहुल चोक्सीला अटक पण प्रत्यार्पणाचे काय?
देशामध्ये अनेक भागांत उष्णतेची लाट सुरू असताना राज्यातही जिल्ह्याजिल्ह्यात वातावरण बदल दिसत आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया देखील वाढली आहे. यामुळे राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडत आहे. अशामध्ये जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक इत्यादी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून सोलापूर अद्यापही 40 अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, सोमवारनंतर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेरनंतर चोपडा तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे गहू, केळी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला मका पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले. नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली. यामुळे उन्हाळ कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकांचे नुकसान झाले. तसेच, रविवारी येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला.