Praful Patel clarifies position on Ajit Pawar and Sharad Pawar coming together
Marathi April 14, 2025 03:32 AM


गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. यानंतर अजित पवार हे आपल्या आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच 10 एप्रिल रोजी अजित पवार यांचे धाटके चिंरजीव जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवारांनी त्यांचे काका म्हणजेच शरद पवार यांच्या स्वागतासाठी गेटपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे चच्च एकमेकांच्या बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुढील काही काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Praful Patel clarifies position on Ajit Pawar and Sharad Pawar coming together)

रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते. याचसंदर्भात प्रफुल पटेल यांना विचारला असता, ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील आणि शरद पवार यांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार हे या संस्थेचे विश्वस्त आहेत, तर शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीत दोन्ही नेते जर एकत्र आलेत तर, त्यात आश्चर्याची गोष्ट नाही. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर, त्यात काही चुकीचं नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोन्ही नेते एकत्र येत असतील तर त्यात काही चुकीचं नाही, असा पुनरुच्चार प्रफुल पटेल यांनी केला.

हेही वाचा – Ajit Pawar : चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय म्हणणारे अजितदादा म्हणतात, काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं

एकनाथ शिंदेंकडून अमित शाहांकडे अजित पवारांची तक्रार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहांची भेट घेऊन शिवसेनेतील आमदारांना निधीसाठी दुजाभाव होत असल्याची तक्रार केल्याची चर्चा सध्या होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात प्रफुल पटेल यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे कोणतीही खंत किंवा तक्रार केलेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: सुनील तटकरेंकडे जेवणासाठी एकत्र होतो. तेव्हा तिथे कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही तिथे सगळे भेटलो आणि जेवण केलं. महाराष्ट्रात आमची महायुती भक्कमपणे कशी चालवायची याबद्दल आम्ही सर्वांनी शुभचिंतन केलं, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी एकनाथ शिंदे यांनी तक्रार केल्याच्या बातमीचे खंडन केले.

हेही वाचा – BJP : संजय राऊतांची अमित शहांवर टीका; आशिष शेलार म्हणतात, मी त्यांना इसबगोल सप्रेम भेट देतो



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.