कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः तालुक्यात सध्या वनवे वणवे लागण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामुळे जंगलातील जैवविविधता आणि वन्य पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बहुतांश वेळा मानवी चुकांमुळे वणवे लागत असून याप्रकरणी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कर्जत - मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ वर, कडाव–कशेळेदरम्यान जांभूळवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी वणवा लागला होता. दुपारच्या वेळी लागलेल्या आगीने झपाट्याने रौद्र रूप घेतले आणि जंगल परिसर जाण्याच्या मार्गावर होते. या वेळी एका तरुणाने सतर्कता दाखवून जवळच्या नाल्यातील पाणी घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी आपत्ती टळली. मात्र, आगीची तीव्रता इतकी होती की संपूर्ण जंगलाला झळ पोहोचली.
वणवा नियंत्रणासाठी जाळ रेषा (फायर लाइन) तयार करणे, पेटती सिगारेट फेकण्यासंदर्भात जनजागृती करणे, तसेच सतत गस्त ठेवणे या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकाकडून होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींनी पेटती सिगारेट फेकल्यामुळे किंवा इतर ज्वलनशील कारणांमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. वनविभागाने याप्रकरणी तत्काळ कारवाई करणे, तपास सुरू करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.