धर्मादायचे संकेतस्थळ 'व्हेंटिलेटर'वर
esakal April 14, 2025 01:45 PM

पुणे, ता. १३ : कोणत्या धर्मादाय रुग्णालयात निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती खाटा (बेड) शिल्लक आहेत याची माहिती धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर दररोज मिळते. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याने पुण्यातील ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी कोणत्या रुग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळत नसल्याने गरजू रुग्णांना सवलतीच्या दरांतील उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.

पुण्यातील ५८ रुग्णालये धर्मादाय योजनेच्या अंतर्गत आहेत. या रुग्णालयांमध्ये असलेल्या एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा या निर्धन रुग्ण (पिवळी शिधापत्रिकाधारक अथवा वार्षिक उत्पन्न एक लाख ८० हजारांच्या आतील) यांच्यासाठी एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा राखीव ठेवणे व त्यांना मोफत उपचार देणे बंधनकारक आहे. तर ‘आर्थिक दुर्बल रुग्ण’ (वार्षिक उत्पन्न तीन लाख ६० हजारांच्या आत असलेले) त्यांच्यासाठीही दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यासह बिलामध्ये ५० टक्के सूट देणे बंधनकारक असावे, असा उच्च न्यायालयाच्या आदेशाने नियम घालून दिलेले आहेत. या खाटांपैकी कोणत्या रुग्णालयांत किती खाटा भरलेल्या आहेत, किती रिक्त आहेत, याची पारदर्शकपणे माहिती धर्मादायच्या संकेतस्थळावर टाकण्याची सुविधा ही आठ ते दहा वर्षांपूर्वी सूरू झाली. यामध्ये तत्कालीन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचा सिंहाचा वाटा होता.

दररोज या धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर रुग्णालयांना त्यांच्याकडे किती खाटा भरलेल्या, किती रिक्त व त्यासंदर्भात कोणाशी संपर्क करायचा, याबाबत माहिती अद्ययावत करणे गरजेचे असते. काही रुग्णालये ही माहिती दररोज अद्ययावत देखील करत असतात. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला उपचार नाकारल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. धर्मादाय रुग्णालयांत किती खाटा शिल्लक आहेत, त्यांच्याकडे किती निधी शिल्लक आहे, हे देखील प्रश्न ऐरणीवर आले. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धर्मादाय रुग्णालयांचे संकेतस्थळ बंद असल्याने या रुग्णालयांची माहितीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात ४८० धर्मादाय रुग्णालये
महाराष्ट्रात ४८० धर्मादाय रुग्णालये असून त्यांच्यामध्ये १० ते ११ हजार खाटा निर्धन व आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, त्या सर्वांना संकेतस्थळ बंद असल्याने माहिती मिळत नाही. त्यासाठी हे संकेतस्थळ सूरू करण्याची मागणी होत आहे.

हे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे कोठे किती खाटा शिल्लक आहेत कळत नाहीत. त्याचबरोबर त्या रुग्णालयांतील वैद्यकीय समाजसेवकांचे संपर्क क्रमांक होते. ते आधी दिसत होते ती माहिती मिळणे देखील आता बंद झाले आहे. ट्रस्टचे नाव टाकल्यावर जे तपशील मिळायचे ते बंद झाले आहे. तसेच, धर्मादाय योजना काय आहे हे देखील कळत नाही. काही दिवसांनी नागरिक याबाबत विसरून जातील. अशा तातडीच्या सेवा बंद पडायला नको आहेत.
- लक्ष्मण चव्हाण, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते

संकेतस्थळ काही तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. परंतु, ते लवकरच सूरू करण्यात येईल. नागरिकांना धर्मादाय रुग्णालयांमधून मदत करण्याबाबत धर्मादाय कार्यालय मदत करते.
- रजनी क्षीरसागर, धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.